नांदगाव येथे शेतवस्तीवर चोरी ; एक लाख ६० हजार रुपयांचा ऐवज लंपास

वैजापूर ,१४ जुलै /प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील नांदगाव येथील शेतवस्तीवर चोरांनी दोन भावांच्या घरावर भरदिवसा डल्ला मारुन रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा सुमारे एक लाख ६० हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केला. नांदगाव शिवारातील शेत गट क्रमांक ३८ मध्ये राहणारे वारुनाथ गाढे व त्यांचे मोठे भाऊ अशोक गाढे यांच्या घरात गुरुवारी दुपारी दीड ते पावणे पाच वाजेच्या दरम्यान ही चोरीची घटना घडली.

वारुनाथ गाढे यांच्या घरातुन तीन तोळे सात ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने ज्यात एक नेकलेस, सात ग्रॅम वजनाचे कानातले, दोन तोळ्याची सोन्याची पोत व पंधरा हजार रुपये रोख असा एक लाख ४१ हजार ५०० रुपये किमतीचा ऐवज चोरी झाला तर त्यांचे भाऊ अशोक यांच्या घरातुन रोख रुपये अठरा हजार रुपये चोरांनी लंपास केले. नांदगाव शिवारातील शेत गट क्रमांक ३८ मधील शेतवस्तीवर वारुनाथ, अशोक व कारभारी हे तिघे भाऊ कुटुंबियांसह राहतात व शेती करतातच. गुरुवारी है तिघेही शेतात काम करण्यासाठी गेले होते. ही संधी साधत चोरट्यांनी घराचे कुलूप तोंडुन घरात जाऊन कपडे व सामान अस्ताव्यस्त केले व ऐवज चोरुन पलायन केले. याबाबत वारुनाथ गाढे यांनी फिर्याद दिल्यानंतर अज्ञात व्यक्तींविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास हेड कॉन्स्टेबल संतोष सोनवणे हे करीत आहेत.