युती का तुटली? बेईमानी करणा-यांचे बिंग फडणवीसांनी फोडले

भाजपा आणि महायुती लोकसभेच्या ४५, विधानसभेच्या २०० पेक्षा अधिक जागा  जिंकेलभाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : उद्धव ठाकरेंनी नुकतेच पोहरा देवीचे दर्शन घेतले. त्यावेळी त्यांनी भाषण करताना सांगितले की पोहरा देवीची शपथ घेऊन सांगतो भाजपाने मला फसवले आहे. त्यावर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्त्युत्तर दिले. २०१९ मध्ये उद्धव ठाकरेंनी आपल्या पाठीत खंजीरच खुपसला. बेईमानीशिवाय याला काहीही म्हणता येत नाही. तुम्ही बघा मोदींचे मोठमोठे फोटो लावून मतं मागितली होती. त्यांचे फोटो लावून तुम्ही मतं मागितली आणि मग तुम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बरोबर जाता? हा दगा, हा खंजीर देवेंद्र फडणवीसच्या पाठीत नव्हता, देवेंद्र फडणवीस निमित्त होतं. हा खंजीर भाजपाच्या पाठीत खुपसला. ज्या भाजपाने कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जो पक्ष उभा केला त्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीत खंजीर खुपसला गेला होता. याचं उत्तर देणं आपल्याला गरजेचं होतं. आणि ते आपण दिल्याने ते बिथरले आहेत. खोट्या शपथा घेत आहेत.

उद्धव ठाकरेंनी पोहरा देवीची खोटी शपथ घेतली असेल आणि नंतर मनातल्या मनात देवीची माफी देखील माफी मागितली असेल. असे फडणवीस म्हणाले आणि त्यांनी २०१९ मध्ये युती तुटण्यामागील सर्व सत्यच सांगितले. नेमकं काय घडलं होत हे त्यांनी आज भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना संपूर्ण घटनाक्रम सांगितला.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, २०१९ ला काय झालं? भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचं पूर्ण बहुमत आलं होतं. हे मी पुन्हा सांगतो आहे. पण अलिकडच्या काळात काही लोक शपथाही खोट्या घेत आहेत. किमान पोहरा देवीला जाऊन शपथ घेतली. पण मनात त्यांनी माफी मागितली असेल आणि निश्चितपणे देवी त्यांना माफ करेल. मी आज पुन्हा सांगतोय, युतीची बोलणी सुरु होती. ती सुरु असताना एका रात्री सन्माननीय उद्धव ठाकरेंनी सांगितलं की हे सगळं जरी बरोबर असलं तरीही मी दोन दिवसांपूर्वी अमितभाईंशी बोललो होतो. मी त्यांना विनंती केली आहे की आम्हाला मुख्यमंत्रीपद मिळालं पाहिजे. मी म्हटलं मला हे सांगण्यात आलेलं नाही. तेव्हा रात्री एक वाजला होता.

सकाळी मी अमितभाईंना फोन केला, त्यांना सांगितलं की उद्धवजी म्हणत आहेत तुमच्याशी त्यांचं बोलणं झालं आहे आणि ते म्हणत आहेत सीट वगैरे ठीक आहे पण मुख्यमंत्रीपद हवं आहे. मी कॉन्फिडंट नाही तुम्ही सांगा काय करायचं. त्यावेळी अमितभाई म्हणाले, मी त्यांना स्पष्ट सांगितलं आहे की, मुख्यमंत्रीपदाच्या संदर्भात वर्षानुवर्षे आपला फॉर्म्युला ठरला आहे. त्यामुळे या संदर्भात कुठलीच तडजोड होणार नाही. काही खाती जास्त हवी ती देऊ. मंत्रिपदं जास्त देऊ पण मुख्यमंत्रीपद वाटलं जाणार नाही. हे होत नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी बोलणी थांबवा आणि नंतर काय करायचं ते बघू. ते मी उद्धवजींना सांगितलं की मी अमितभाईंशी बोललो आणि त्यांनी मला सांगितलं की मुख्यमंत्रीपद वाटता येणार नाही. त्यावेळी मला उद्धव ठाकरे म्हणाले हे होणार नसेल तर युती करणं कठीण आहे. ते त्यांच्या घरी गेले, मी माझ्या घरी गेलो आणि सगळा संवाद संपला.

तीन दिवसांनी एक मध्यस्थ माझ्याकडे आले, त्यावर ते म्हणाले की उद्धव ठाकरेंची पुन्हा चर्चेची इच्छा आहे. मी म्हटलं पुन्हा बोलायचं असेल तरीही अट तीच आहे. त्यावर ते म्हणाले की त्यांनी आग्रह सोडला आहे. आता त्यांचे म्हणणे असं आहे की पालघरची जागा जी आपण जिंकलो होतो, ती आम्हाला हवी. पालघरची जागा दिली तर कार्यकर्ते नाराज होतील. त्यावेळी मला नेते असं म्हणाले की एखाद्या जागेसाठी युती तोडणं योग्य नाही. आम्ही बसलो, मुख्यमंत्रीपदाचा विषय सील झाला. पालघरची जागा त्यांना दिली. त्यानंतर युती झाली.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी पुन्हा सांगतो की ज्या बाळासाहेबांच्या खोलीविषयी ते वारंवार सांगतात त्याच खोलीत उद्धव ठाकरे, अमित शाह आणि मी होतो. काही काळ आधी ते बसले होते. मला बोलावण्यात आलं सगळ्या गोष्टी दूर झाल्या आहेत आता आम्ही दोघांनी ठरवलं आहे की, पत्रकार परिषदेत तू एकट्याने बोलायचे आम्ही बोलणार नाही. मी मराठीत काय बोलणार आहे ते बोलून दाखवलं. हिंदीत बोलून दाखवलं. त्यानंतर वहिनी आल्या (रश्मी ठाकरे), त्यांच्यासमोरही बोलून दाखवलं.

अशा गोष्टी सांगायच्या नसतात पण मला सांगायची वेळ आली आहे. मी पुन्हा वहिनींसमोर म्हणून दाखवलं आणि तंतोतंत तेच पत्रकार परिषदेत बोललो. त्यावेळी उद्धव ठाकरेंचे शब्द होते की मी खूप टोकाचं बोलून गेलो आहे, आमचं फेस सेव्हिंग झालं पाहिजे असं तुम्ही बोला. त्यामुळे मी अतिशय तोलामोलाच्या शब्दांमध्ये बोललो आणि ती पत्रकार परिषद संपली.

त्यानंतरच्या प्रत्येक सभेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि उद्धव ठाकरेही देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात लढतो आहे, आपल्याला मुख्यमंत्री फडणवीसांना बनवायचं आहे असं अनेकदा सांगितलं. निवडणूक झाल्यानंतर जसं लक्षात आलं की नंबरगेम सांगतो की इकडे तिकडे केलं तर गणित जमू शकतं. मी अधिक खोलात जात नाही. आपण त्यावेळी गाफील राहिलो होतो. प्रेमाने विश्वास ठेवला होता. नंबरगेम झाल्यावर उद्धव ठाकरेंनी शब्द फिरवला. उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली त्यात जाहीर केलं की, आमच्यासाठी सगळे दरवाजे खुले आहेत. त्यानंतर काय झालं सगळ्यांना माहित आहे. त्यानंतर सात-आठ दिवसांनी काय झालं, राष्ट्रवादीची ऑफर कशी आली? हे सगळं अजित पवारांनी सांगितलं. मी जे काही केलं होतं ते ठरवून आणि सगळ्यांशी बोलून केलेले होते.

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा विश्वास

भारतीय जनता पार्टी आणि महायुती लोकसभेच्या 45 पेक्षा अधिक आणि विधानसभेच्या 200 पेक्षा अधिक जागा जिंकेल असा विश्वास भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी व्यक्त केला. भिवंडी (जि.ठाणे) येथे प्रदेश भाजपातर्फे आयोजित महाविजय 24 कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत श्री.बावनकुळे बोलत होते. प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, ठाणे शहर अध्यक्ष आ.निरंजन डावखरे यावेळी उपस्थित होते. मोदी सरकारची विकास कामे तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार या तीन नेत्यांच्या दूरदृष्टीचा फायदा होऊन महायुती ऐतिहासिक विजय प्राप्त करेल असे त्यांनी नमूद केले.

श्री. बावनकुळे म्हणाले की, भाजपा महाराष्ट्रात क्रमांक एकचा पक्ष आहे आणि यापुढेही राहील. पार्लमेंट ते पंचायत स्तरापर्यंत आम्ही झटून काम करू. येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये भाजपा अव्वल कामगीरी करेल. विधानसभा निवडणुकीत महायुतीमध्ये भाजपाला ज्या जागा मिळतील त्यापैकी 80 टक्के जागांवर म्हणजे 152 जागांवर भाजपा विजयी होईल असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला. महाराष्ट्राला विकासाच्या दृष्टीने पहिल्या क्रमांकावर घेऊन जाण्यासाठी, विकासात्मक बाबी लक्षात घेऊन नियोजनबद्धरित्या भाजपा ताकदीने काम करेल अशी ग्वाही त्यांनी दिली.

ते म्हणाले की, घर चलो अभियानाच्या माध्यमातून राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या योजना प्रत्येक घरापर्यंत पोहोचवणार आहोत. आगामी निवडणुकांसाठी भाजपाची यंत्रणा युद्धस्तरावर कामाला लागली असून कामांचा आढावा घेण्यासाठी २८८ वॉररुम्स तयार आहेत. भाजपामध्ये मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश व्हावेत यासाठी योजना तयार करण्यात आली आहे .

प्रदेश भाजपातर्फे आयोजित ‘महाविजय 2024’ कार्यशाळेचे उदघाट्न प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रीय सरचिटणीस आणि राज्याचे प्रभारी सी.टी.रवी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. केंद्रीय लघु, मध्यम व सूक्ष्म उद्योग मंत्री नारायण राणे, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, वैद्यकीय शिक्षण व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, मुंबई अध्यक्ष आ. आशीष शेलार, ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष आ. किसन कथोरे आदी यावेळी उपस्थित होते. केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी प्रास्ताविक केले.