शिंदे-फडणवीस-पवार सरकार टिकविण्यासाठी १२ जणांची समिती स्थापन

मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झालेल्या राष्ट्रवादीच्या ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, अद्याप खातेवाटप आणि मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या तीन वेळा बैठका झाल्या. चर्चेच्या फे-याही झाल्या. मात्र खातेवाटप अद्यापही प्रलंबित आहे. त्यावर ठोस निर्णय घेतला जात नाही. त्यामुळे तिन्ही पक्षाचे आमदार नाराज असल्याची चर्चा आहे. शिवाय, अर्थ खाते राष्ट्रवादीला नको, अशी आग्रही भूमिका शिंदे गटाची आहे. त्यामुळे महायुतीत खातेवाटपावरून सर्व काही आलेबेल नसल्याचे बोलले जात आहे. कालच आमदार बच्चू कडू यांनी तीन इंजिनचे सरकार कधीही कोसळू शकते, असे वक्तव्य केले. याच पार्श्वभूमीवर आता महायुतीने तीन पक्षांच्या समन्वयासाठी १२ जणांच्या समन्वय समितीची स्थापन केली आहे. भाजप आमदार प्रसाद लाड हे या समितीचे प्रमुख समन्वयक आहेत.

गेल्या एका वर्षापूर्वी राज्यात शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आले. मात्र, आता राष्ट्रवादीचा अजित पवार गट सत्तेत सहभागी झाल्याने सध्या राज्यात तीन पक्षाचे सरकार आहे. सत्तेत नवा वाटेकरी आल्याने शिंदे गट नाराज आहे. दरम्यान, या महायुतीच्या सरकारमधील तीनही पक्षांमध्ये समन्वय साधण्यासाठी एका समन्वय समितीची घोषणा करण्यात आली आहे. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी या तीनही पक्षांमधील प्रत्येकी चार सदस्यांचा समावेश या समितीत असणार आहे. बारा सदस्य असलेली ही समिती समन्वय साधण्याचे काम करेल.

भाजपमध्ये प्रसाद लाड हे समन्वयक म्हणून काम पाहतील. तसेच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेकर बावनुकळे, मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार प्रसाद लाड, आमदार आशिष शेलार यांचा समावेश आहे. तर शिवसेना (शिंदे गट) कडून मंत्री उदय सामंत, शंभूराज देसाई, दादा भुसे, राहुल शेवाळे हे समन्वय प्रमुख म्हणून काम पाहणार आहेत. तर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून सुनील तटकरे, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, धनंजय मुंडे यांचा समन्वय समितीत समावेश आहे.

सत्तेतील तीनही पक्षांच्या विचाराधारा वेगवेगळ्या आहेत. शिवाय, तीनही पक्षांच्या आमदारांच्या मागण्या या वेगवेगळ्या आहेत. या बाबी ध्यानात घेता ही समिती स्थापन केली आहे. काही वाद असेल तर तो बंद दाराआड सोडवला जावा. त्याची बाह्यवाच्यता होऊ नये, याची खबरदारी घेण्यासाठी ही समिती काम करणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेकर बावनुकळे यांनी स्पष्ट केले आहे.