सर्व निवडणुका स्वबळावर लढणार-राज ठाकरे 

व्यभिचारी राजकारणासाठी तडजोड करावी लागली तर मी घरात बसेन

चिपळूण : “राज्यात जो राजकीय व्यभिचार सुरु आहे तो मी करणार नाही. मला तडजोड करावी लागली तर मी घरात बसेन पण तडजोड करणार नाही.” असा निर्धार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे  यांनी रत्नागिरीतील चिपळूण येथील महाराष्ट्र सैनिकांच्या मेळाव्यात बोलताना केले. मनसे प्रमुख राज ठाकरे दोन दिवसीय कोकण दौऱ्यावर आहेत. आज ते चिपळूणमध्ये आहेत. त्यानंतर ते खेड आणि दापोलीला भेट देणार आहेत.

या दौऱ्यादरम्यान, राज ठाकरे यांनी राज्यातील बदललेल्या राजकारणावर आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठे विधान केले. तसेच त्यांची राजकीय दिशा काय असेल याचेही सूतोवाच केले आहेत.

राज्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजप आणि शिंदे गटाशी हातमिळवणी केल्याने ही समीकरणे बदलली आहेत. त्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला. राज्यात जो व्यभिचार सुरू आहे. त्यावर मी मेळावा घेऊन संताप व्यक्त करणार असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

लोकसभेची निवडणूक का लढवायची असा सवालही यावेळी पदाधिकाऱ्यांना राज ठाकरेंनी केला. सद्यपरिस्थितीवर बोलताना ते म्हणाले, मी पुढील १५ दिवसात मेळावा घेणार आहे. त्या मेळाव्यात सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करेन. मेळाव्याच्या माध्यमातून माझ्या मनातील संताप बाहेर काढणार असल्याचेही ठाकरे यांनी सांगितेल.दरम्यान, हव्यासापोटी राजकारण अस्थिर… अस्थिरतेमुळे उद्योगविश्वात अविश्वास… विद्वेषामुळे समाज अस्वस्थ… अत्याचारामुळे महिला असुरक्षित… बेरोजगारीमुळे तरुणाई खचलेली… महागाईमुळे कुटुंब त्रस्त… प्रश्नांचा पाढा वाचावा तितका कमीच… महाराष्ट्र चौफेर खदखदतोय पण याच ज्वलंत प्रश्नांवर मतदारराजा मतदान करेल कि पुन्हा खोट्या अस्मितेच्या लाटेवर स्वार होईल… तुम्हाला काय वाटते? अशा शब्दांत मनसेने राज्यातील सध्याच्या राजकारणावर टीका केली.