अखेर दोन्ही गटाला नावे मिळाली, उद्धव ठाकरे यांच्या हाती ‘मशाल’

तिसरा पर्याय म्हणून मशाल चिन्ह देण्यात आले आहे. शिंदे गटाला तीन नवीन चिन्हे देण्याची सूचना करण्यात आली

मुंबई ,​१०​ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- उद्धव ठाकरे गटाला ‘उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव आणि मशाल चिन्ह मिळाले आहे. शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असे नाव मिळाले आहे. दोन्ही गटांच्या वतीने उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी आज निवडणूक आयोगाकडे चिन्ह आणि नावाची कागदपत्रे सादर केली होती. निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे.पण एकनाथ शिंदे गटाला अजून कोणतंही चिन्ह देण्यात आलेलं नाही. निवडणूक आयोगाने त्रिशूळ आणि गदा ही दोन्ही चिन्ह बाद केली आहेत.

दोन्ही गटांच्या नावावर आणखी एक पर्याय केंद्रीय निवडणूक आयोगाने मंजूर केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ असे नाव देण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना ‘मशाल’ हे चिन्ह देण्यात आले आहे. तसेच शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असे नाव देण्यात आले आहे. उद्धव ठाकरे यांनी त्रिशूल चिन्हाची मागणी केली होती. ते धार्मिक प्रतीक असल्याने ते देता येत नाही. तसेच, उगवता सूर्य हे तामिळनाडूमध्ये पक्षाचे चिन्ह असल्याने हे चिन्ह देता येणार नाही, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले. त्यामुळे तिसरा पर्याय म्हणून मशाल चिन्ह देण्यात आले आहे. शिंदे गटाला तीन नवीन चिन्हे देण्याची सूचना करण्यात आली. पहिल्या दोन चिन्हांबाबत निवडणूक आयोगाने आधीच आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 

ठाकरे गटाकडून नावांचे तीन पर्याय
धनुष्यबाण चिन्हाबरोबर शिवसेना हे नावही वापरता येणार नसल्याने ठाकरे गटाकडून तीन नावांचा पर्याय देण्यात आला होता. यात 
१.शिवसेना बाळासाहेब ठाकरे
२. शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे
३. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अशा तीन नावांचा पर्याय देण्यात आला होता. यापैकी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव निश्चित करण्यात आलं आहे. आता अंधेरी पोटनिवडणूक ठाकरे गट याच नावावर लढवणार आहे.

शिंदे गटाकडून नावांचे तीन पर्याय
शिंदे गटाकडून तीन नावाचा प्रस्ताव देण्यात आला होता. आपल्या पक्षाच्या नावात बाळासाहेबांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे.  यात
१. बाळासाहेब ठाकरे 
२. बाळासाहेबांची शिवसेना
३. शिवसेना बाळासाहेबांची
अशा तीन नावांचा पर्याय देण्यात आला होता. यापैकी दुसरा म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना हे नाव निवडणूक आयोगाने शिंदे गटाला दिलं आहे. 

शिवसेना आणि मशालीचे जुने नाते काय?

आधी शिवसेना नोंदणीकृत पक्ष नव्हता त्यामुळे शिवसेनेला 1989 मध्ये धनुष्यबाण चिन्ह मिळाले होते. त्याआधी शिवसेनेच्या उमेदवारांची नोंद ही अपक्ष म्हणून व्हायची. तर 1985 साली छगन भुजबळ हे मशाल चिन्हावर विधानसभेत विजयी झाले होते. तर, औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील सेनेचा पहिला खासदारसुद्धा मशाल याच चिन्हावर निवडून आला होता, असे शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी सांगितले.

तसेच 1989 च्या लोकसभा निवडणुकीत औरंगाबाद लोकसभा मतदार संघात शिवसेना पुरस्कृत मोरेश्वर सावे हेसुद्धा मशाल चिन्हावर खासदार झाले होते. शिवसेनेने यापूर्वी ढाल, तलवार, रेल्वे इंजिन, उगवता सूर्य, या विविध चिन्हांचा वापर केला होता.

 आम्हीच बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे…

– बाळासाहेबांच्या विचारांची भूमिका आम्ही घेतली होती आणि आज देखील बाळासाहेबांची शिवसेना म्हणून आमच्या पक्षाला मान्यता दिली. यासाठी आम्ही निवडणूक आयोगाचे आभार मानतो.

– उद्या आम्हाला दुसरं चिन्हं दिली जातील

– त्यांना मिळालेले चिन्ह आणि नाव त्या बाबत त्यांनाच विचारा

– मशाली अन्याया विरुद्ध पेटवल्या पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात त्यांनी देखील मशाली पेटवल्या होत्या. आम्ही पण बघू हे अन्याया विरोधात मशाली पेटवतायतेत का?

– अंधेरीची निवडणूक आम्ही युती म्हणून लढवू

– आम्ही धन्युषबाण चिन्ह मागितले होते. पण ते आम्हाला मिळाले नाही याचे दुःख आहे. बहुमत ज्याच्याकडे असते त्यांना चिन्ह मिळते. त्यामुळे हा आमच्यावर अन्याय आहे

– मेरीटवर आम्हाला चिन्ह मिळाले पाहिजे

– विधानसभेत आणि शिवसेनेच्या ७० टक्के जास्त पदाधिका-यांनी आम्हाला पांठिबा दिला आहे.

– उलट्या काळजाचे कोण, विश्वास घातकी कोण हे सर्वांना माहिती आहे. उलट्या काळजाच्या माणसाने २०१४ साली ज्याला दया माया नाही निती धर्म नाही सर्वच त्याग केला त्यांनी आत्मपरीक्षण करावे. फक्त सोशल मिडियावर बदनामी केली जातेय.

– बहुमताचे आकडे आम्ही सादर केलेत. समोरच्यांनी मात्र बोगस एफीडेव्हिट केले काही फरार आहेत हे मोठे रॅकेट आहे

– चिन्हावरचा दावा आमचा ॲान मेरीट पेंडीग आहे. आमचा धनुष्य बाणावरील दावा आहे. ते आम्हाला मिळाले नाही हा आमच्या वरचा अन्याय आहे.