कोरोनाविरुद्धचा लढा सुरूच! ‘गर्दी टाळा-शिस्त पाळा’- मुख्यमंत्र्यांचे राज्यातील जनतेला आवाहन

मुंबई दि १०:   कोरोनाविरुद्धचा आपला लढा संपलेला नाही तो सुरुच आहे, त्यामुळे आपल्याला सावध राहून कोरोनासोबत जगावे लागेल, कुठेही घाई गडबड करून किंवा गर्दी करून चालणार नाही असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील नागरिकांना गर्दी टाळण्याचे आणि कोरोनाला दूर ठेवण्यासाठी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे पुढे म्हणाले की,  लॉकडाऊन जसे टप्प्याटप्प्याने लावले तसेच ते टप्प्याटप्प्याने  आपण हटवत आहोत, कोरोनासोबत जगतांना आपल्याला सावधानता बाळगायची आहेच, मास्क लावणे, हात धुत राहणे यासारख्या  सवयी अंगी बाळगायच्याच आहेत, गर्दी करायची नाही, झुंडीने फिरायचे नाही.  संकट अजून टळलेले नाही. कोरोनाविरुद्धचा आपला लढा संपलेला नाही. सावध राहून अर्थचक्र सुरु करतांना सर्व नियमांचे पालन करूनच आपल्याला काम करावयाचे आहे. मिशन बिगिन अगेन अंतर्गत आपण काही नियम शिथिल केले असता  पहिल्या दिवशी गर्दी झालेली दिसली. असे करू नका,  सकाळी पाच ते सायंकाळी ७ पर्यंत फिरायला जाण्याची, व्यायाम करण्याची मुभा दिली ती आरोग्यासाठी, गर्दी करून आरोग्य बिघडवण्यासाठी नाही हे ही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.  

राज्यातील जनतेवर विश्वास

सर्व सांगून आणि काळजी घेऊनही परिस्थिती हाताबाहेर जातांना दिसली, ती जीवघेणी होतांना दिसली तर पुन्हा लॉकडाऊन लावावे लागेल, पण राज्य सरकार जे काही निर्णय घेत आहे ते जनतेच्या हिताचेच आहेत याची कल्पना जनतेला असल्याने राज्यातील नागरिक ती वेळ येऊ देणार नाहीत. शिस्त पाळून शासनाला सहकार्य करतील,  त्याबद्दल मला विश्वास वाटतो असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. अत्यावश्यक सेवेतील, जीवनावश्यक काम करणाऱ्या लोकांसाठी लोकल सुरु करण्याची मागणी केंद्र शासनाकडे केल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी केला.

राज्यातील पायाभूत सुविधांच्या कामांवर स्थानिकांना रोजगार द्या, कामे बंद पडू देऊ नका- मुख्यमंत्री

मुंबई, दि. १०: राज्यात सुरू असलेल्या मेट्रोसारख्या पायाभूत सुविधांच्या विकास कामासांठी स्थानिकांना रोजगार देऊन कामे बंद पडू देऊ नका, भूमिपुत्रांना रोजगार देतानाच कामांसाठी लागणारे प्रशिक्षण देखील त्यांना द्या, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिले.

मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर मेट्रो तसेच मुंबई ट्रान्स हार्बर लिंक आदी विकास कामांचा आढावा घेतला. यावेळी मंत्रालयात नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे व  संजय बनसोडे, मुख्य अजोय मेहता, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, कोरोनामुळे राज्यभरात लॉकडाऊन झाले, आता मुंबई महानगर परिसर, पुणे वगळता राज्यात अन्य ठिकाणी उद्योग सुरू झाले आहेत. मात्र मजुरांची आणि कर्मचाऱ्यांची कमतरता जाणवत आहे. परराज्यातील मजूर त्यांच्या गावी गेले आहेत. ते जेव्हा परत येतील तोपर्यंत त्यांच्यावर विसंबून न राहता विकास कामांसाठी लागणारे कुशल, अकुशल कर्मचारी, मजूर यांची विभागवार यादी करा. त्याचबरोबर कोणत्या विभागात रोजगार उपलब्ध आहे याचाही तपशील घ्या आणि राज्यभर कुशल मनुष्यबळ उपलब्धतेसाठी जाहिराती द्या. खास करून जेथे जेथे मेट्रोची कामं सुरू आहेत तेथे मोठ्या प्रमाणावर जाहिराती द्या. त्यामुळे राज्यातील भूमिपुत्रांना रोजगार मिळेल. सुरूवातीच्या काळात या भूमिपुत्रांना काही काळ प्रशिक्षण देण्याची व्यवस्था देखील करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.


राज्य शासनाच्या कौशल्य विकास विभागाच्या समन्वयातून कुशल मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. विकासकामे करतांना त्याचा प्राधान्यक्रम ठरवा. पावसाळा सुरू होत आहे. कोरोनाच्या परिस्थितीमुळे काही ठिकाणी सुरू असलेली विकासकामे बंद आहेत, अशा वेळी प्रमुख शहरांमध्ये कुठलीही अडचण, पूरस्थिती उद्भवणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. तातडीने डेब्रिज उचलणे, ड्रेनेज पाईप दुरुस्ती करणे आदी कामांवर लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.  यावेळी मुंबई मेट्रो, पुणे, नागपूर, नाशिक मेट्रोचे सादरीकरण करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *