गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी घेतला ‘म्हाडा’च्या विविध कामांचा आढावा

मुंबई : गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) विविध उपक्रमांचा तसेच भविष्यातील योजनांचा सविस्तर आढावा घेतला.

मंत्री श्री. सावे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार नारायण कुचे, गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य  सचिव वल्सा नायर सिंह, ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल, मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर, गृहनिर्माण विभागाचे उपसचिव अजित कवडे, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी अरुण डोंगरे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

गिरणी कामगारांना द्यावयाची घरकुले, बीडीडी चाळ पुनर्वसन, संक्रमण शिबिरांचा पुनर्विकास करताना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा तसेच व्यावसायिक दृष्ट्या विकास करण्याच्या विचार करण्यात यावा. असे निर्देश मंत्री श्री. सावे यांनी दिले. ‘म्हाडा’संक्रमण शिबिराचा पुनर्विकास, पुढील तीन वर्षांकरिता प्रस्तावित गृहनिर्माण योजना, ‘म्हाडा’ वसाहतीतील इमारतींचा पुनर्विकास, बीडीडी चाळीचा पुनर्विकास, मुंबई मंडळ अंतर्गत अभिन्यासाची माहिती, गिरणी जमिनीचा विकास, कोकण गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ याबाबत सविस्तर आढावा घेत मंत्री श्री. सावे यांनी ‘म्हाडा’च्या जागेवरील अतिक्रमण निर्मूलनासंदर्भात लवकरच व्यापक बैठक आयोजित करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी श्रीमती वल्सा नायर सिंह, श्री. जयस्वाल यांनी आपापल्या विभागांची माहिती सादर केली.