टोमॅटो दरवाढ रोखण्यासाठी केंद्र सरकारचा पुढाकार

महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रातून विकत घेऊन सवलतीच्या दरात पुरवठा

नवी दिल्ली : देशात टोमॅटोच्या किंमतीत झालेली मोठी दरवाढ रोखण्यासाठी केंद्र सरकारवर विशेष उपाययोजना करण्याची वेळ आली आहे. देशात अनेक शहारांमध्ये टोमॅटोचा किलोचा दर १५० ते २०० रुपयांच्या घरात पोहोचला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने पुढाकार घेत मार्गदर्शक तत्वे घालून दिली आहेत. त्यानुसार आता केंद्र सरकार महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून टोमॅटोंची खरेदी करून मोठी दरवाढ असलेल्या ठिकाणी ती सवलतीच्या दरात विकणार आहे.

देशात यंदा मान्सूनच्या आगमनाला विलंब झाल्याने भाजीपाला उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यामुळे त्यांची बाजारात आवक घटली आहे. किंमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. विशेषत: टोमॅटोचा मोठ्याप्रमाणावर तुटवडा निर्माण झाला आहे. टोमॅटो २०० रुपये किलोवर गेला आहे. परिणामी सर्वसामान्य जनतेच्या आहारातून टोमॅटो बहुतांशी गायब झाल्याचे चित्र आहे. त्यावर उपाय म्हणून बुधवारी केंद्र सरकारच्या ग्राहक मंत्रालयाने मार्गदर्शक तत्वे जाहीर केली. त्यानुसार नाफेड आणि नॅएनसीसीएफ या संस्थांमार्फत महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेशातून टोमॅटो विकत घेतले जाणार आहेत. ज्या शहरांत किंवा प्रदेशातील बाजारात टोमॅटोचे दर वाजवीपेक्षा अधिक वाढले आहेत, त्यांची यादी तयार करण्यात येत आहे. या ठिकाणी रिटेल दुकानांतून सवलतीच्या दरात टोमॅटो विकले जातील.

सध्या महाराष्ट्राच्या सातारा, पुण्याचे नारायणगाव आणि नाशिक पट्ट्यातून टोमॅटोंची बाजारात आवक होत आहे. आंध्र प्रदेशच्या मदनपल्ली (चित्तूर) भागातूनही टोमॅटो येत आहेत. याशिवाय, दिल्ली-एनसीआर भागात हिमाचल प्रदेश आणि कर्नाटकच्या कोलार प्रदेशातून टोमॅटो येत आहेत. लवकरच नाशिक, नारायणगाव, छत्रपती संभाजीनगर आणि मध्य प्रदेशातून आणखी टोमॅटोंची आवक होण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर बाजारातील परिस्थितीत काहीसा बदल होऊ शकतो.

टोमॅटो तुटवड्याची कारणे
साधारण जुलै-ऑगस्ट आणि ऑक्टोबर-नोव्हेंबर या काळात बाजारात टोमॅटोंची आवक मंदावते. पण यंदा मान्सूनच्या पावसाने केलेला विलंब, मार्च ते मे महिन्यांत असलेले अत्यधिक तापमान आणि सध्या सुरू असलेली अतिवृष्टी या कारणांनी टोमॅटोची आवक घटली आहे. त्यामुळे किंमती वाढल्या आहेत.