माजी खासदार विजय दर्डा, माजी कोळसा सचिव एच. सी. गुप्ता कोळसा घोटाळ्यात दोषी

एकूण सात दोषींत मुलगा देवेंद्र दर्डाचाही समावेश; शिक्षेची सुनावणी मंगळवारी

नवी दिल्ली, १३ जुलै/प्रतिनिधीः- राज्यसभेचे माजी सदस्य विजय दर्डा आणि माजी कोळसा सचिव एच. सी. गुप्ता हे दिल्ली न्यायालयाने गुरुवारी कोळसा घोटाळ्यात दोषी ठरवले. छत्तीसगडमधील कोळशाच्या खाण वाटपात झालेल्या अनियमितांत एकूण सात जण दोषी ठरले असून त्यात दर्डा आणि गुप्ता यांचा समावेश आहे.

image.pngदेवेंद्र  दर्डा 

या घोटाळ्यात ही १३ वी दोषसिद्धी आहे. विशेष न्यायाधीश संजय बन्सल यांनी विजय दर्डा यांचा मुलगा देवेंद्र दर्डा, दोन वरिष्ठ सरकारी नोकर के. एस. ख्रोपा आणि के. सी. सामरिया, मेसर्स जेएलडी यवतमाळ एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड आणि तिचे संचालक मनोज कुमार जायसवाल यांनाही दोषी ठरवले.

न्यायालयाने आरोपींना गुन्हेगारी कारस्थान (भारतीय दंड संहितेचे कलम १२०-बीअंतर्गत दंडनीय) आणि फसवणूक (भारतीय दंड संहितेचे कलम ४२० अंतर्गत दंडनीय) आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याखाली दोषी धरले आहे. या दोषींना १८ जुलै रोजी शिक्षा सुनावली जाणार आहे. त्यादिवशी न्यायाधीश युक्तिवाद ऐकतील.

वरिष्ठ सरकारी वकील ए. पी. सिंह यांचे सीबीआयने आपली बाजू निःसंशयपणे सिद्ध केली आहे हे म्हणणे न्यायालयाने मान्य केले. दि. २० नोव्हेंबर, २०१४ रोजी न्यायालयाने या प्रकरणाचा सीबीआयचा क्लोझर रिपोर्ट स्वीकारण्यास नकार देत या प्रकरणी आणखी चौकशी करण्याचा आदेश दिला होता. न्यायालयाने तेव्हा म्हटले होते की, तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांना विजय दर्डा यांनी लिहिलेल्या पत्रांत वस्तुस्थितीचा विपर्यास करण्यात आला होता. सिंग यांच्याकडे तेव्हा कोळसा खातेही होते.

विजय दर्डा हे लोकमत ग्रुपचे अध्यक्ष आहेत. दर्डा यांनी छत्तीसगडमधील फतेहपूर (पूर्व) कोळसा खाण मिळण्यासाठी तसे केले, असे न्यायालयाने म्हटले होते. जेएलडी यवतमाळ एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडला ती खाण दिली गेली होती.