माजी मंत्री नवाब मलिक यांचा वैद्यकीय जामीन नाकारला

याचिकेवर दोन आठवड्यांनी गुणवत्तेच्या आधारावर होणार सुनावणी

मुंबई, १३ जुलै/प्रतिनिधीः– राज्याचे माजी मंत्री नवाब मलिक यांना मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी तात्पुरता वैद्यकीय जामीन नाकारला. हवाला व्यवहार केल्याच्या आरोपावरून मलिक यांना अटक झालेली आहे.

न्यायाधीश अनुजा प्रभूदेसाई यांनी जामीन नाकारताना मलिक यांच्या याचिकेवर दोन आठवड्यांनी गुणवत्तेच्या आधारावर सुनावणी केली जाईल, असे म्हटले. फेब्रुवारी २०२२ मध्ये मलिक यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) हवाला व्यवहाराच्या आरोपांवरून अटक केली होती. गुन्हेगारी जगताशी संबंध असलेल्या एका कमी किमतीतील मालमत्तेच्या व्यवहारातून ही कारवाई झाली.

ईडीने आरोपपत्र दाखल केल्यावर मलिक यांनी जामिनासाठी मे २०२२ मध्ये विशेष हवाला व्यवहार प्रतिबंधक कायदा न्यायालयात धाव घेतली. मलिक यांचा अर्ज या न्यायालयाने नाकारल्यावर त्यांनी नोव्हेंबर २०२२ मध्ये मुंबई उच्च न्यायालयात जामीन मागितला. जामिनासाठी मलिक यांचे वकील अमित देसाई यांनी म्हटले की, मलिक यांची शारीरिक प्रकृती गंभीर असून त्यांना मूत्रपिंडाचा त्रास आहे आणि त्यांच्या उजव्या मूत्रपिंडाची अवस्था खालावत चालली आहे.

नवाब मलिक यांनी असा युक्तिवाद केला की, राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावरील आदेशात मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवलेल्या निरीक्षणांचा विशेष न्यायालयाला विचार करण्यात अपयश आले आहे. गुणवत्तेच्या मुद्याशिवाय मलिक यांनी वैद्यकीय मुद्यांचाही उल्लेख केला. या मुद्यांना अतिरिक्त सॉलिसीटर जनरल अनिल सिंह यांनी ईडीच्या वतीने प्रखर विरोध केला.