एमआयएम ही भाजपची बी टीमच, आघाडी नाहीच-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एमआयएमचा प्रस्ताव धुडकावला

मुंबई,२० मार्च  /प्रतिनिधी :-एमआयएमने महाविकास आघाडीत येण्याचा प्रस्ताव दिल्यानंतर राजकीय धुरळा उडालेला आहे. महाविकास आघाडीचे नेतेच नव्हे तर भाजपच्या नेत्यांनीही यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. भाजपने तर या प्रस्तावावरून शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला आहे.

शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. उद्धव ठाकरे यांनी एमआयएमचा प्रस्ताव धुडकावून लावला आहे. एमआयएम ही भाजपची बी टीम आहे. त्यामुळे त्यांच्याशी आघाडी करण्याचा प्रश्नच येत नाही, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच विरोधकांच्या मतदारसंघात शिवसेना वाढवा. शिवसेनेची ताकद राज्यभर वाढवा, असे आदेश देतानाच शिवसंपर्क अभियानाचं मिशन यशस्वी करूनच या, अशा शुभेच्छाही त्यांनी शिवसेना खासदार आणि जिल्हाप्रमुखांना दिल्या आहेत. तसेच येत्या काळात आपणही महाराष्ट्र पिंजून काढणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

शिवसेना खासदार आणि जिल्हाप्रमुखांचं शिवसंपर्क अभियान सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी शिवसेना खासदार आणि जिल्हा प्रमुखांशी आज संवाद साधला. यावेळी त्यांनी एमआयएमसोबत जाणार नसल्याचं स्पष्ट केलं. शिवसेना ही प्रखर राष्ट्रवादी पक्ष आहे. शिवसेना हिंदुत्ववादी पक्ष आहे आणि विचार आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी जो विचार दिला आहे. तो विचार आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे. आपल्याबाबत संभ्रम निर्माण केला जात आहे. त्याला बळी पडू नका. राज्यातील जनतेत जो संभ्रम निर्माण होत आहे, तो दूर करा, असं उद्धव ठाकरे यांनी खासदार आणि जिल्हा प्रमुखांना सांगितलं.

भाजपच्या मतदारसंघात जोरात तयारी करा

महाराष्ट्र हिंदुत्वाच्या विचाराने कसा पेटला हे दाखवून द्या. महाराष्ट्राच्या नादाला लागू नका हे दिल्लीकरांनाही कळू द्या. शिवसेनेच्या भगव्याला बदनाम करणाऱ्यांना नेस्तनाबूत करा. भाजपने जे मतदारसंघ जिंकले त्या ठिकाणी जोरात तयारी करा. भाजपची जिथे ताकद आहे तिथे आपली ताकद वाढली पाहिजे. शिवसेना अंगार आहे, भाजप भंगार आहे हे दाखवू द्या, असं आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केलं.

शिवसंपर्क अभियान

राज्यात शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीसाठी तसेच राज्यात गेल्या अडीच वर्षात शिवसेनेनं केलेल्या आणि करत असलेल्या विकासात्मक कामांची माहिती सर्वसामान्य जनते पर्यत पोहचवण्यासाठी, शिवसेनेनं “शिव संपर्क अभियान” सुरू केलंय. या अभियानाचा पहिला टप्पा 22 ते 25 मार्च दरम्यान पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यातील एकूण 19 जिल्ह्यात सुरू होणार आहे. या 19 जिल्ह्यात शिवसेनेचे 19 खासदार शिव संपर्क अभियान सुरू करणार आहेत.