मनसेच्या बाईक रॅलीवरून पोलिस प्रशासनाविरुद्ध रंगला कलगीतुरा

औरंगाबाद ,२१ मार्च /प्रतिनिधी :-छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार शिवजयंती निमित्ताने मनसेच्या वतीने बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यास पोलिस प्रशासनाने परवानगी नाकारल्यानंतर देखील मनसे कार्यकर्ते रॅलीवर ठाम होते. यामुळे पोलिस प्रशासन व मनसेत काही काळ संघर्ष निर्माण झाला. 

Displaying 20220321_092916.jpg


कॅनॉट प्लेस ते क्रांती चौक असे बाईक रॅलीचे आयोजन होते. रॅली दरम्यान अफझल खान वधाच्या प्रसंगाचे एक पोस्टर सोबत होते. धार्मिक भावना दुखावल्या जातील अशी सबब पुढे करत पोस्टर जप्त करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष आशिष सुरडकर, नेते प्रकाश महाजन व पोलिस प्रशासनात प्रचंड वादविवाद झाला. ‘आमच्या सोबत मुस्लिम कार्यकर्ते आहेत. त्यांच्या भावना दुखावत नाहीत. तुम्ही कोणत्या लोकांच्या भावना सांगत आहात” असा सवाल मनसेच्या वतीने उपस्थित करण्यात आला.
नाट्यमय घडामोडी नंतरही बाईक रॅली
कॅनॉट प्लेस ते क्रांती चौक येथे मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत बाईक रॅली संपन्न झाली. प्रचंड विरोध झाल्यानंतर देखील मनसैनिकांचा उत्साह तसूभर देखील कमी झाला नाही हे विशेष. तसेच दिवसभर नियोजित असलेले सर्व कार्यक्रम वेळेनुसार व कितीही विरोध झाला तरी पार पडतील अशी माहिती शहराध्यक्ष आशिष सुरडकर यांनी दिली.