परतीच्या पावसाने पिकांचे नुकसान; हेक्टरी 75 हजार रुपयांची मदत करा- वैजापूर तालुका काँग्रेसची मागणी

वैजापूर,१९ऑक्टोबर /प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यात परतीच्या पावसामुळे दाणादाण उडवून दिली असून अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या मका, सोयाबीन, कापूस पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 75 हजार रुपये मदत करावी व दिवाळीपूर्वी ही मदत बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावी अशी मागणी वैजापूर तालुका काँग्रेसच्यावतीने करण्यात आली आहे.

या संदर्भात तालुका काँग्रेसच्यावतीने बुधवारी(ता.19) तहसीदार राहुल गायकवाड यांना निवेदन देण्यात आले. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील सदाफळ, शहराध्यक्ष काझी मलिक, मधुकर साळुंके, बाबासाहेब गायकवाड, राजेंद्र मगर, भगवानराव घोगरे, सागर थोट, दत्तू जगताप, अण्णासाहेब जगताप, गणेश धारबळे, रोहित आहेर, विकीराज सोमवंशी आदी उपस्थित होते.