तोंड सांभाळून बोला अन्यथा तुम्हाला तोंड लपवून फिरावे लागेल:शिवसेनेचा आदित्य ठाकरेंना इशारा

मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत असून त्यात विरोधक आणि सत्ताधारी आमनेसामने येणार आहेत. तत्पूर्वी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंकडून वारंवार शिंदे गटावर निशाणा साधला जात आहे. हे सरकार घटनाबाह्य आहे, खोके घेऊन गद्दारी केली असा आरोप आदित्यकडून केला जातो. त्यावर आता शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी आदित्य ठाकरेंना तोंड सांभाळून बोला अन्यथा तुम्हाला तोंड लपवून फिरावे लागेल, निर्वाणीचा इशारा दिला आहे.

शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे म्हणाल्या की, तुम्ही ज्यावेळी आम्हाला घटनाबाह्य सरकार म्हणून संबोधता पण याच सरकारकडून तुम्ही ‘सामना’त जाहिराती घेता तेव्हा तुम्हाला जरासुद्धा आत्मसन्मान असेल तर या जाहिराती घ्यायला नको होत्या. आमच्यावर खोक्यांचा आरोप करता परंतु तुम्हाला कुणाकडून, कधी आणि किती खोके मिळाले आणि कुठल्या वाहनातून हे खोके मिळाले हे आम्ही लोकांना सांगायला लागलो तर तुम्हाला तोंड लपवून फिरावं लागेल असा इशारा त्यांनी आदित्य ठाकरेंना दिला.

तसेच तुमच्या मुंबई महाराष्ट्र वगळता देशात आणि देशाच्या बाहेर किती प्रॉपर्टी आहेत हे जर जनतेला समजलं तर तुम्हाला मुंबईतून नव्हे तर देशातून बाहेर जावं लागेल. आपला कुठला बिझनेस आहे ज्यामुळे तुम्ही मातोश्री २ सारखे घर बांधता? ते ही लोकांना समजू द्या. वेगवेगळे जनसंवाद, आदित्य संवाद वैगेरे इव्हेंट करता त्यासाठी पैसे लागतात हे पैसे कुठून आणलेत कसे आणलेत हेदेखील लोकांना समजू द्या. ज्यांच्याबद्दल तुम्ही बोलता त्यांनी शिवसेना वाढवण्यासाठी, संघटना मजबूत करण्यासाठी काय काय कष्ट केलेत याची माहिती करून घ्या असंही शीतल म्हात्रेंनी आदित्य ठाकरेंना सुनावलं आहे.

दरम्यान, आपल्या पिताश्रींनी हे माहिती नसेलच पण जुन्या शिवसैनिकांना विचारा. ही सर्व मंडळी आहेत त्यांनी शिवसेना वाढवण्यासाठी काय केलंय. आपल्या पिताश्रींनी याच शिवसेनेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या पायाशी नेऊन ठेवले आहे. ही शिवसेना वाचवण्यासाठी उचललेली पाऊले आहेत. आदित्य ठाकरे तुम्ही ज्यांच्याबद्दल बोलताय ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्याबद्दल काहीही बोललेले महाराष्ट्रातील जनता खपवून घेणार नाही. शिवसैनिक सहन करणार नाहीत त्यामुळे तोंड सांभाळून बोला असेही शीतल म्हात्रेंनी खडसावले आहे.