“शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र” हे मुख्यमंत्र्यांचे अभिवचन घोषणेत विरले

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी साधला मुख्यमंत्र्यांवर निशाणा

यवतमाळ ,१९ सप्टेंबर  /प्रतिनिधी :- राज्यात शेतकऱ्यांच्या मोठया प्रमाणात आत्महत्या होत आहेत ही विघातक परिस्थिती आहे. राज्याला शेतकरी आत्महत्यामुक्त करु हे मुख्यमंत्र्यांनी दिलेले अभिवचन घोषणेत विरले अशा शब्दांत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.
विदर्भ दौऱ्यावर असताना आज यवतमाळ जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या आढावा बैठकीनंतर ते प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.

May be an image of 5 people, people sitting, people standing and indoor

अतिवृष्टीमुळे झालेले खरीप पिकांचे नुकसान, नुकसानग्रस्त व आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना मिळालेली अपुरी मदत, जिल्ह्यातील कायदा व सुव्यस्था आदी विषयांवर आज जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत आढावा घेण्यात आला.अतिवृष्टीमुळे यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत, त्यामुळे आज विदर्भाचा दौरा या जिल्ह्यातून सुरू केला आहे. शेतकरी आत्महत्येमुळे राज्याला काळा डाग लागतो. शेतकरी हिताच्या अनेक योजना असून त्याची योग्य ती अंमलबजावणी होत नसल्याची खंत दानवे यांनी व्यक्त केली.

योग्य प्रचार व प्रसाराअभावी शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी असलेल्या पोखरा योजनेचा लाभ तळागळ्यातील शेतकऱ्यांपर्यंत न पोहचल्याने विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना धारेवर धरले.पोखरा योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी त्याचा योग्य प्रचार प्रसार करा. शेतात योग्य पीक येण्यासाठी मातीचे परीक्षण करा, पूरग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत उपलब्ध करून द्या, सामाजिक दायित्व म्हणून शेतकऱ्यांना सहकार्य करा अशा सूचना दानवे यांनी यावेळी केल्या.

राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना कोणतीच मदत मिळाली नाही!

विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या अतिवृष्टी पाहणी दौऱ्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा

May be an image of 5 people, people standing and outdoors

अतिवृष्टी व वर्धा नदीच्या प्रकल्पातून सोडलेल्या पाण्यामुळे जमीन खरडून गेल्याने बाधित शेतकऱ्यांना सरकारकडून कोणतीच मदत मिळाली नसल्याचे सांगत आज शेतकऱ्यांनी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या अतिवृष्टी पाहणी दौऱ्यात आपल्या व्यथा मांडल्या.

अतिवृष्टीमुळे व अप्पर वर्धा, लोअर वर्धा व बेंबळा या प्रकल्पातील अतिरिक्त पाणी सोडल्याने जमीन खरडून गेल्याने यवतमाळ जिल्ह्यातील अनेक गावांतील कापूस, सोयाबीन व तूर उत्पादक शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. आज विरोधी पक्षनेते दानवे यांनी
दापोरी(कसारा), मारेगाव तालुका दांडगाव, वनोजा (देवी) या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करीत शेतकऱ्यांशी संवाद साधला.

May be an image of 11 people, people standing, tree and outdoors

अतिवृष्टी व अतिरिक्त पाणी सोडल्याने जमीन खरडून गेली त्यामुळे तीबार पेरणी करावी लागली, त्यामुळे मोठया प्रमाणात नुकसान झाले. त्यात सरकारकडून मदत न मिळाल्याने शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ आल्याच्या व्यथा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांनी दानवे यांच्याकडे मांडल्या.

मानवनिर्मित चुकांमुळे शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान होत असून त्यांना जीव गमवावा लागत आहे. यावर आवाज उचलून शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही दानवे यांनी शेतकऱ्यांना दिली.

झाडगाव ता. राळेगाव येथील शेतकरी मयूर संगेवार, चहांद गावातील श्याम व राहुल धोबे, मारेगाव तालुका दांडगाव येथील तोताराम चिंचुलकर व बोरी गावातील पुंडलीक रोयारकर या अतिवृष्टीमुळे व अतिरिक्त पाणी सोडल्यामुळे बाधित आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या घरी त्यांनी आज सांत्वनपर भेटी दिल्या.

शिवसेनेने दिला शेतकरी कुटुंबियांना मदतीचा हात
सरकारकडून अतिरिक्त पाणी सोडल्यामुळे तिबार पेरणी करून शेतीचे नुकसान झालेल्या बोरी गावातील पुंडलीक रोयारकर यांच्या कुटुंबियाला यवतमाळ जिल्ह्यातील शिवसैनिकांनी २५ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली. यावेळी त्यांच्या कुटुंबियांचा अश्रूचा बांध फुटला. त्यांच्या मुलीने भावुक होऊन दानवेंचे आभार मानले. भावुक झालेल्या मुलीला धीर देत दानवे यांनी शिवसेना त्यांच्या सोबत असल्याचा शब्द दिला.

यावेळी जिल्हाप्रमुख राजेंद्र गायकवाड, विश्वास नांदेकर, उप-जिल्हाप्रमुख किशोर इंगळे, प्रवीण शिंदे, गजानन डोमाले, रवी पालगंधे, संजय निखाडे, शरद ठाकरे, बळीराम मुटकुळे,तालुका प्रमुख संजय रंगे, प्रमोद भरवाडे, रवींद्र भारती, रवी बोडेकर, सतीश नाईक, शहरप्रमुख सुधीर थेरे, चंद्रकांत घुगुल, संजय अवारी शहर प्रमुख झरी संजय बिजगुंवार, महागांव शहर प्रमुख तेजस नरवाडे, अभय चौधरी, वाहतूक जिल्हाप्रमुख शैलेश गाडेकर, युवासेना जिल्हाप्रमुख विशाल पांडे, विशाल गणात्रा, विक्रांत चचडा आदी उपस्थित होते.