पीकविमा संदर्भात माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर यांची अधिकाऱ्यांसोबत बैठक

वैजापूर ,​१०​ जानेवारी / प्रतिनिधी :-वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी पीकविमा भरूनही विमा कंपनीने शेतकऱ्यांना पीकविमा मंजूर केला नाही यासंदर्भात माजी आमदार भाऊसाहेब चिकटगांवकर यांनी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. विमा कंपनीकडे पैसे भरूनही शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर का करण्यात आला नाही असा प्रश्न उपस्थित करून सर्व शेतकऱ्यांना पिकविमा मंजूर करण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली.

जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीस जिल्हा कृषी अधिकारी श्री.तौर, ऍग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनीचे जिल्हासमन्वयक पी.आर.कांबळे उपस्थित होते.

तालुक्यातील मौजे राहेगाव/सोनवाडी परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी पीकविम्याची संबंधित विमा कंपनीकडे तक्रार केली अशा शेतकऱ्यांना विमा कंपनीने पीकविमा मंजुर केला नाही. अशा राहेगांव, सोनवाडी, उंदीरवाडी, राजुरा, धोंदलगाव, भायगांव गंगा, मांडकी, लाखणी, पाथरी, लासुरगांव येथील एक हजार 270 शेतकऱ्यांनी विमा पावती जमा केल्या. 

   वैजापुर तालुक्यात अतिवृष्टीमुळे सर्वच पिकांचे मोठे नुकसान झाले आहे, शासन देखील अतिवृष्टीचे अनुदान देते आहे आणि शेतकऱ्यांनी तर विमा कंपनीकडे पैसे भरलेले आहेत मग शेतकऱ्यांना पीक विमा का नाही. असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला.

    सर्व शेतकऱ्यांना पीकविमा मिळाला पाहीजे, पीकविमा भरलेल्या सर्व शेतकऱ्यांना पीकविमा तात्काळ मंजुर करावा असे निवेदन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी तौर व जिल्हा समन्वयक,ऍग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी पी.आर.कांबळे यांना यावेळी देण्यात आले.

बैठकीस प्रा.अशोक म्हस्के, हरी तात्या कदम, कैलास मामा ठुबे, संदीप गोरे, काशिनाथ भालेकर, भागिनाथ सोनवणे, काकासाहेब काळे, ज्ञानेश्वर वैद्य, बद्रीनाथ वैद्य, राजु सुरासे, दिलीप आवारे, विष्णू पानसरे, बाबासाहेब ढंगारे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.