वैजापूर एस.टी. आगारातील सर्व कर्मचारी संघटना संपावर ;प्रवाशांचे हाल

वैजापूर ,७ नोव्हेंबर  /प्रतिनिधी :- राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करून शासन नियमाप्रमाणे सर्व सोयी सवलती, वेतन व भत्ते लागू करण्यात यावे यासह विविध मागण्यांसाठी वैजापूर आगारातील एस.टी. कर्मचारी पुन्हा आज रविवार दुपारपासून बेमुदत संपात सहभागी झाले आहेत.एस.टी.ची चाके थांबल्याने दुपारनंतर प्रवाशांचे हाल झाले.
या संदर्भात एस.टी. कर्मचाऱ्यांच्या संयुक्त कृती समितीच्यावतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना शासनाच्या इतर विभागाच्या तुलनेत कमी पगार देऊन अन्याय केला जात आहे. अत्यंत कमी पगार असल्यामुळे या पगारातून मूलभूत गरजा सुद्धा भागविणे कठीण झाले आहे. कर्मचारी कर्जबाजारी झालेला असून काही कर्मचाऱ्यांनी आलेल्या नैराश्यातून आत्महत्या सारखे गंभीर पाऊल उचलले आहे. जवळपास 35 कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत आत्महत्या केल्या आहेत.महाराष्ट्र कामगार संघटनेचे पी.एल.जाधव, आर.एस.मुळे,महाराष्ट्र एस.टी.वर्कर्स (इंटक) चे एस.एस.मोरे,के.यु.पगारे, महाराष्ट्र कामगार सेनेचे पी.एफ.बनकर,दीपक तुपे,एस.टी.कास्ट्रॉइब संघटनेचे एस.ए.धनेधर,एस.बी.धनेधर,उत्तम आवारे, झेड.पी.खोचे या पदाधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी शिवसेना आ.रमेश पाटील बोरणारे, मा.नगराध्यक्ष साबेर खान व जिल्हा परिषद सदस्य पंकज ठोंबरे यांची भेट घेऊन मागण्यासंदर्भात त्यांच्याशी चर्चा केली.