वैजापुरात आरटीओ पथकाची ५० वाहनांविरुद्ध दंडात्मक कारवाई

वैजापूर ,१२ जुलै /प्रतिनिधी :-ओव्हरलोडींग, परवाना नसणे, कागदपत्रांमध्ये अनियमतता या कारणांवरून छत्रपती संभाजीनगर येथील प्रादेशिक परिवहन विभागाच्या पथकाने बुधवारी (ता.12) पहाटेपासूनच वैजापूर शहरात कारवाई सुरु केली. या कारवाईत जवळपास ५० वाहनांना पकडून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली. या कारवाईमुळे वाहनधारकांत खळबळ उडाली.

गोदावरी नदीपात्रातून वाळुची क्षमतेपेक्षा अधिक वाहतुक करणारी अनेक वाहने विशेषत: हायवा एरव्ही रस्त्यावर दिसतात. मात्र या कारवाईबाबत आधीच भनक लागल्याने वाळु वाहतुक करणारे एकही वाहन पकडले गेले नाही.‌ वैजापूर शहरात सकाळी  प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ ) ने धरपकड करत ओव्हरलोड तसेच लायसन्स व कागदपत्रांची अनियमितता आढळून आलेल्या वाहनांवर लाखो रुपयांची दंडात्मक कारवाई करत वाहने वैजापूर बस आगाराच्या आवारात लावण्यात आली. घटनेची माहिती मिळताच आमदार रमेश पाटील बोरनारे यांनी परिवहन अधिकाऱ्यांची भेट घेतली व कांदा व फळांची वाहने नुकसान टाळण्यासाठी तातडीने सोडण्याची सुचना केली. त्याची दखल घेत अधिकाऱ्यांनी संबंधित वाहन मालकाकडून येत्या सात दिवसांत दंडाची रक्कम भरु असे लेखी घेऊन वाहने सोडली. रिक्षा चालकांनी तीनच प्रवासी बसवत नियमांचे पालन केले.