पर्यावरण दिन विशेष:पर्यावरण रक्षणासाठी महावितरणचे एक पाऊल पुढे

औरंगाबाद परिमंडलात १० हजार २२३ ग्राहकांनी गो ग्रीनसाठी नोंदणी, ग्राहक घेताहेत लाभ, दरमहा १० रुपये सवलत
Displaying Mahavitaran--Go-Green.jpg

औरंगाबाद,५ जून /प्रतिनिधी:-

 पर्यावरण रक्षणासाठी महावितरणनेही एक पाऊल पुढे टाकले आहे. कागदी वीजबिलाऐवजी ग्राहकांना ई-मेल व एसएमएसवर बिल पाठवण्याची गो-ग्रीन योजना महावितरणने सुरू केलेली आहे. या योजनेत राज्यातील सुमारे सव्वादोन लाख हजार तर औरंगाबाद परिमंडलातील १० हजारांहून अधिक ग्राहकांनी भाग घेतला आहे. या ग्राहकांना बिलात दरमहा १० रुपयांची सवलतही देण्यात येत आहे. इतर ग्राहकांनीही कागदी बिल नाकारून पर्यावरण रक्षणाचा संकल्प करावा आणि योजनेच्या सवलतीचा  लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

        छापील वीजबिलांसाठी मोठ्या प्रमाणावर कागद लागतो. हा कागद आणि पर्यायाने वृक्षतोड वाचावी या उदात्त हेतूने महावितरणने काही वर्षांपूर्वी गो-ग्रीन योजना सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत छापील बिल नाकारून केवळ ई-बिल घेणाऱ्या ग्राहकास दरमहा ३ रुपये सवलत दिली जात असे. ग्राहकांचा या योजनेकडे कल वाढावा यासाठी १ डिसेंबर २०१८ पासून ही सवलत दरमहा १० रुपये करण्याचा निर्णय महावितरणने घेतला. यानंतर गेल्या अडीच वर्षांत गो-ग्रीन योजनेला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. राज्यातील २ लाख १९ हजार ८३७ ग्राहकांनी या योजनेसाठी नोंदणी केली आहे. औरंगाबाद परिमंडलात १० हजार २२३ ग्राहकांनी गो ग्रीनसाठी नोंदणी केली आहे. त्यात औरंगाबाद शहर मंडलातील ५५१३, औरंगाबाद ग्रामीण मंडलातील २८५३ तर जालना मंडलातील १८५७ ग्राहकांचा समावेश आहे. ‘गो-ग्रीन’चा पर्याय निवडण्यासाठी ग्राहकांनी आपल्या वीजबिलावरील ‘गो-ग्रीन’ क्रमांकाची नोंदणी महावितरणच्या मोबाईल ॲपद्वारे अथवा महावितरणच्या https://consumerinfo.mahadiscom.in/gogreen.php या लिंकवर जाऊन करावी, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात येत आहे. ‘गो-ग्रीन’चा पर्याय निवडणाऱ्या ग्राहकांना तातडीने ई-मेलद्वारे वीजबिल मिळणार असून संदर्भासाठी वीजबिलाचे जतन करणेही त्यांना सोपे ठरणार आहे. ‘गो-ग्रीन’चा पर्याय पर्यावरण संवर्धनालाही हातभार लावणारा आहे. त्यामुळे जास्तीत जास्त वीजग्राहकांनी कागदविरहित ‘गो-ग्रीन’ सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.