वैजापूर राष्ट्रवादीत दोन गट ..? पंकज ठोंबरे समर्थकांसह ‘दादांसोबत’ राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अँड.प्रतापराव निंबाळकर यांच्या भूमिकेकडे लक्ष

वैजापूर ,१२ जुलै /प्रतिनिधी :-अजित पवार यांनी सरकारसोबत जाण्याची भुमिका घेत बाळासाहेबांची शिवसेना अर्थात शिंदे गट व भाजपच्या सरकारला पाठिंबा दिला.‌ यानंतर वैजापूर येथे राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते व माजी जिल्हा परिषद सदस्य पंकज ठोंबरे व जेष्ठ नेते भाऊसाहेब ठोंबरे यांच्या शिष्टमंडळाने मुंबई येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन आपण सोबत असल्याची ग्वाही दिली. मात्र या शिष्टमंडळात राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष ॲड.प्रतापराव निंबाळकर यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांचा समावेश नसल्याने त्यांच्या भुमिकेकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 

दरम्यान, याबाबत ॲड. प्रताप निंबाळकर यांच्याशी संपर्क साधला असता येत्या दोन दिवसांत पक्षातील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करुन कुणासोबत जायचे याचा निर्णय जाहीर करु असे त्यांनी सांगितले. त्यामुळे वैजापुरात राष्ट्रवादी कॉग्रेसची भुमिका अद्याप अधांतरी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अजित पवार यांच्या फुटी नंतर वैजापूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील कार्यकर्ते कोणासोबत हा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र या प्रश्नाला उत्तर देत “ओन्ली दादा’ अशी फेसबुक पोस्ट करत ठोंबरे गटाच्या प्रमुख निवडक पदाधिका-यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबईतील त्यांचे शासकीय देवगिरी निवासस्थानी भेट घेऊन अजित पवार यांच्यासोबत असल्याचे स्पष्ट उत्तर दिले.

दुभंगलेल्या पक्ष संघटनेत पदाधिकारी व कार्यकर्ते कोणत्या पर्यायाची निवड करावी या द्विधा मनस्थितीत होते. पदवीधर मतदार संघाचे आमदार सतीश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस मधून राष्ट्रवादीत दाखल झालेले ज्येष्ठ नेते भाऊसाहेब ठोंबरे, त्यांचे पुतणे माजी जिल्हा परिषद सदस्य पंकज ठोंबरे यांनी पक्षातील इतर सहका-यांशी विचार विनिमय करुन समर्थन कुणाला द्यायचे भुमिका प्रारंभी जाहीर केली होती. मंगळवारी सकाळी  राष्ट्रवादी काँग्रेसचे शिष्टमंडळाने मुंबईतील देवगिरी या सरकारी निवासस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली.या शिष्टमंडळात ज्येष्ठ नेते भाऊसाहेब ठोंबरे, माजी जिल्हा परिषद सदस्य पंकज ठोंबरे,माजी जिल्हा परिषद सदस्य सूरज नाना पवार, माजी तालुकाध्यक्ष दत्तात्रय त्रिभुवन, रामचंद्र शेळके, सत्यजीत सोमवंशी, अमृत शिंदे, ज्ञानेश्वर घोडके, गणेश पवार, अँड.ज्योती शिंदे यांचा समावेश होता.