वैजापूर शहरात विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजल्या शाळा

वैजापूर ,१६ जून  /प्रतिनिधी :-आजपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले. या पहिल्याच दिवशी शहर व तालुक्यातील सर्व शाळात सकाळी नऊ वाजल्यापासून विद्यार्थ्यांचा किलबिलाट सुरू झाला आणि शाळेत जिकडे -तिकडे आनंदी आनंद दिसू लागला.

काही शाळांमध्ये मुलां-मुलींचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले तर काही ठिकाणी “आम्ही शाळेत आलो-तुम्ही पण या “गीताने स्वागत करण्यात आले. शहरातील पालिकेच्या मौलाना आझाद शाळेत माजी शिक्षणाधिकारी धोंडीरामसिंह राजपूत यांनी प्रवेश दारावर “शाळा झाल्या सुरू-शाळेत जाऊ तुरु तुरु” ही कविता गाऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले व त्यांना वह्या पुस्तके वाटप केली.याप्रसंगी बरेच पालक उपस्थित होते.

मुख्याध्यापक जी.जी.राजपूत, बी.बी.जाधव, शिक्षिका नीता पाटील, लता सुखासे, सुवर्णा बोर्डे, ज्योती दिवेकर, राजश्री बंड, सुनीता वसावे, संदीप शेळके, रावकर, तगरे, पालक मोती हिवाळे, मीना मापारी, रफिया खान आदी उपस्थित होते. मुलां-मुलींची उंची व वजन मोजण्यात येऊन बौद्धिक चाचणी ,मानसिक चाचणी घेण्यात आली.भाषा विकास व शारीरिक क्षमता ही पाहण्यात आली. खेळ साहित्य ही त्यांना वापरण्यास देण्यात आले. आपल्या पात्र मुलां-मुलींना शाळेत पाठवून त्यांना परिपूर्ण शिक्षण द्या असे आवाहन श्री.ठाकूर यांनी यावेळी केले .सूत्र संचलन बी.बी.जाधव यांनी केले तर आभार संदीप शेळके यांनी मानले.