भिंगी येथील बंधाऱ्याचे दुरुस्तीचे काम अपूर्ण भिंतीला लिकेज ; पावसाने बंधारा फुटण्याची शक्यता

वैजापूर ,१० जुलै /प्रतिनिधी :-वैजापूर तालुक्यातील भिंगी येथील बंधाऱ्याचे दुरुस्तीचे काम अपूर्ण असून दोन दिवसात मुसळधार पावसामध्ये मोठ्याप्रमाणात पाणी या बंधाऱ्यात जमा झाले आहे. मात्र या धरणाचे दुरुस्तीचे काम अपूर्ण असल्याने या ठिकाणी धरणातील भिंत लीक झाली असून जर धरण पूर्ण भरले तर हे धरण फुटण्याची शक्यता गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

यासोबतच दुरुस्तीचे काम करणाऱ्या ठेकेदाराने सांडव्या करीता खंदून ठेवले मात्र त्या ठिकाणी काम पूर्ण केले नाही. ज्यामुळे हा सांडवा वाहून जाण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत गावकऱ्यांनी अनेकदा संबंधित विभागाला अर्ज केले. मात्र, अधिकाऱ्यांनी तक्रारींकडे कानाडोळा केला. दोन दिवस झालेल्या पावसाने पाणी गावात शिरले व यामुळे गावातील गणेश बोर्डे या शिक्षकाची दुचाकी देखील वाहून गेली आहे. अचानक पाणी वाढल्याने पाणी गावातील शाळेत शिरले होते. या पाण्यामुळे मच्छिंद्र घायवट व बापू घायवट या शेतकऱ्यांच्या गट क्रमांक 81 व 77 मधील  शेतात पाणी घुसून मोसंबीच्या बागेचे नुकसान झाले. अचानक वाढलेल्या पाण्यामुळे गावकऱ्यांनी धरणाकडे धाव घेतली तेंव्हा  धरणातील भिंतीतून पाणी लिक होऊन वाहत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या धरणाचे काम अद्याप अपूर्ण असल्याने या धरणातून पाणी वाहत असून हे धरण फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे.अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

या धरणा बाबत अनेकदा जलसंधारण उपविभाग वैजापूर यांना अर्ज दिले आहे. मात्र त्यांनी कुठल्याही प्रकारची दाखल घेतली नाही. असे ग्रामपंचायत सदस्य कडू गायकवाड  यांनी सांगितले.  भिंगी येथील बंधाऱ्याचे पाहणी केल्यानंतरच दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येईल असे  उपविभागीय अभियंता  केतन साखरे यांनी सांगितले.