वैजापूर कांदा मार्केटमध्ये मध्यरात्री शेतकरी – व्यापाऱ्यांत ‘राडा’ ; वाहनांना प्रवेश देण्यावरून वाद

वैजापूर ,१० जुलै /प्रतिनिधी :-वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शहरालगतच्या कांदा मार्केटमध्ये शनिवारी (ता.08) मध्यरात्री चांगलाच राडा झाला. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मार्केटमध्ये कांदा विक्रीसाठी वाहने घेऊन आले खरे. परंतु मार्केटच्या परिसरात व्यापाऱ्यांची वाहने भरली जात असल्यामुळे त्यांनी शेतकऱ्यांची वाहने मध्ये घेण्यास विरोध केला. त्यामुळे शेतकरी व व्यापाऱ्यांमध्ये हमरीतुमरी होऊन खडाजंगी झाली. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मार्केटमध्ये जाऊन तोडगा काढल्यानंतर हा वाद निवळला. 

  याबाबत अधिक माहिती अशी की, 8 जूलै सायंकाळपासून शेतकऱ्यांनी कांदा विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुंबई-नागपूर महामार्गावर असलेल्या कांदा मार्केटमध्ये आणण्यास सुरुवात केली. मार्केट परिसरात  शेतकऱ्यांच्या वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या. जवळपास पाचशे पेक्षा अधिक वाहने तेथे आली. सध्या कांद्याची आवक वाढल्याने शेतकरी रात्रीपासूनच नंबर लावण्यासाठी वाहने घेऊन आले होते. परंतु त्याचवेळी मार्केट परिसरात आडत व्यापाऱ्यांची वाहने भरली जात असल्यामुळे व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची वाहने प्रवेशद्वारातून आत येऊ देण्यास विरोध केला. त्यामुळे शेतकरी व व्यापाऱ्यांमध्ये मध्यरात्री हमरीतुमरी होऊन राडा झाला. नागपूर-मुंबई महामार्गासह वैजापूर – गंगापूर राज्य महामार्गापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. या प्रकाराची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य पंकज ठोंबरे, ज्ञानेश्वर घोडके, अमृत शिंदे, संदीप मोटे आदींनी तेथे जाऊन चर्चा केल्यानंतर तोडगा काढण्यात आला. शेतकऱ्यांची वाहने मार्केटमध्ये जाऊ देण्यास होकार दर्शविल्याने हा वाद निवळला. दरम्यान यापूर्वी पहाटे पाच वाजता मार्केटचे प्रवेशद्वार शेतकऱ्यांसाठी खुले केले जात होते. त्यामुळे शेतकरी पहाटेच तेथे पोहोचत असत. परंतु आता रात्री बारा वाजताच शेतकर्‍यांसाठी प्रवेशव्दार खुले करण्याचा निर्णय बाजार समितीने घेतला आहे. त्यामुळे शेतकरी सायंकाळीच वाहने आणण्यास सुरवात करतात. मार्केटमध्ये रात्रीच्या वेळी कुणी जबाबदार कर्मचारी तेथे नसतो. त्यामुळे अशा समस्या निर्माण होतात.