वैजापूर शहर व तालुक्यात शंभर टक्के लसीकरण करण्यासाठी सर्वकष प्रयत्न करणार ; मंगळवारपासून सक्त व कडक आदेश – उपविभागीय अधिकारी माणिक आहेर

वैजापूर ,२२ नोव्हेंबर  /प्रतिनिधी :-वैजापूर शहर व तालुक्यात शंभर टक्के लसीकरण करण्यासाठी सर्वकष प्रयत्न करण्यात येणार असून, मंगळवारपासून  सक्त व कडक आदेश अंमलात आणणार असल्याचे उपविभागीय अधिकारी माणिक आहेर यांनी सोमवारी येथे आयोजित लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व धर्मगुरूंच्या बैठकीत सांगितले.

शहर व तालुक्यात शंभर टक्के कोविड लसीकरण करण्यासाठी पंचायत समितीच्या सभागृहात लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी, विविध धर्माचे धर्मगुरू व ग्रामीण भागातील नोडल अधिकारी यांची बैठक झाली.बैठकीत उपविभागीय अधिकारी माणिक आहेर, तहसीलदार राहुल गायकवाड, नगरपालिकेचे मुख्याधिकारी बी.यु.बिघोत यांनी मार्गदर्शन केले.

शहरात 70 टक्केच्या जवळपास लसीकरण झाले असून उर्वरित 30 टक्के लसीकरण करण्यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम आखण्यात आला आहे. शहरात 27 नोव्हेंबर 2021 पर्यंत लसीकरण शिबीर आयोजित केले आहे.आवश्यकता वाटल्यास आणखी लसीकरण केंद्र वाढविण्यात येतील असे मुख्याधिकारी बी.यु.बिघोत या बैठकीत म्हणाले.

‘हर घर दस्तक’ या मोहिमेअंतर्गत नागरिकांच्या घरोघरी जाऊन लस घेण्याबाबत आवाहन करण्यात येणार आहे.तसेच मंगळवारपासून शहर व तालुक्यात सक्त व कडक आदेश अंमलात आणणार असून सर्व शासकीय कार्यालयात लस घेतल्याशिवाय प्रवेश मिळणार नाही.कुटुंबात एक सदस्य जरी लसविना असेल तर राशन मिळणार नाही.असे उपविभागीय अधिकारी माणिक आहेर यांनी सांगितले.
बैठकीस नगराध्यक्षा शिल्पाताई परदेशी, नायब तहसिलदार महेंद्र गिरगे, रामेश्वर महाजन, सहाय्यक पोलीस निरीक्षक बी.एस.भागवत, तहसील कार्यालयाचे पारस पेटारे, स्वच्छता दूत ठाकूर धोंडिरामसिंह राजपूत, व्यापारी महासंघटनेचे  काशिनाथ गायकवाड, वप्रकाशसेठ बोथरा,भाजपा व्यापारी आघाडीचे निलेश पारख, भाजपचे शहराध्यक्ष दिनेश राजपूत, नगरसेवक स्वप्नील जेजुरकर,सखाहरी बर्डे,नगरसेविका अनिता तांबे, सुप्रिया व्यवहारे.डॉ. मनोज चव्हाण, कैलास साखरे,पैठणे आदी उपस्थित होते. मुख्याधिकारी बी.यु.बिघोत यांनी उपस्थितांचे आभार मानले.