वैजापूर तालुक्यातील आघुर येथे प्लास्टिक कारखान्याला आग लावल्याची घटना ; 5 लाखांचे नुकसान

धोंदलगांव येथील दत्तू रोठे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल

वैजापूर ,३० मे /प्रतिनिधी :- पैशाचा वाद करुन प्लास्टिक कारखान्याला आग लावून जवळपास पाच लाख रुपयांचे नुकसान केल्याची ही घटना रविवारी (ता.29) रात्री तालुक्यातील आघूर शिवारात घडली. याप्रकरणी दत्तु रोठे (रा.धोंदलगांव) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 

याप्रकरणी कारखान्याच्या मालक सुरेखा मोटे (रा.‌आघूर) यांनी पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार सुरेखा मोटे यांचा आघूर शिवारातील गट क्रमांक 35 मध्ये मागील दहा वर्षांपासुन तनुजा प्लास्टिक उद्योग नावाचा कारखाना आहे. या कारखान्यात प्लास्टिकची ताडपत्री बनवुन तेथेच विक्री केली जाते. कारखान्यात 16 कामगार असून दोन पाळ्यांमध्ये काम चालते. या कारखान्यात शेतकऱ्यांचे जुने झालेले शेततळ्याचे जीर्ण प्लास्टिक देखील विकत घेतले जाते. दोन दिवसांपुर्वी धोंदलगाव येथील दत्तु रोठे हा शेतकरी कारखान्यात आला व त्याने माझे शेतात 19 गुंठ्यांचे शेततळे असून या शेततळ्याचे प्लास्टिक पेपर मला विकायचे आहे असे सांगितले व या प्लास्टिक पेपरची किती किंमत होईल अशी विचारणा केली. त्यावर कारखान्याचे व्यवस्थापक दत्तात्रय साळुंके यांनी आम्ही 40 रुपये किलो या दराने प्लास्टिक घेतो व वजनानुसार पैसे देऊ असे सांगितले. यावर शेतकऱ्याने अंदाजे किती किंमत होईल असे विचारताच व्यवस्थापकांनी तीस ते पस्तीस हजार रुपये येतील असे सांगितले. रोठे याने आणलेल्या प्लास्टिकचे वजन 591 किलो व किंमत 23 हजार 660 रुपये झाली. प्लास्टिक पेपरची किंमत कमी का दिली याचा राग धरत रोठे याने रात्री पाच लिटर पेट्रोल ओतून कारखान्याला आग लावली. या आगीत पाच लाख रूपयांचे नुकसान झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास हेड कॉन्स्टेबल किसन गवळी करत आहेत.