वैजापुरात महसूल व पोलिस खात्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्या ; नवा भिडू, नवा राज सुरू

वाळू तस्करीसह अवैध धंदे मोडीत काढण्याचे आव्हान 

​वैजापूर ,९ जुलै /प्रतिनिधी :-​वैजापूर येथील महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांसह पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या होऊन नव्याने अधिकारी रुजू झाल्याने वैजापुरात सध्या नवा भिडू, नवा राज सुरू झाला आहे. या अधिकाऱ्यांनी गेल्या आठवड्यातच पदभार स्वीकारला आहे. या नूतन अधिकाऱ्यांसमोर वाळूतस्करीसह धान्यतस्करी व अन्य अवैधधंदे मोडीत काढण्याचे मोठे आव्हान असणार आहे. विशेषतः गेल्या अनेक महिन्यांपासून महसूल प्रशासनास वाळूमाफियांच्या मुसक्या आवळण्यात यश आले नाही. दुसरीकडे शहर व परिसरात गुटखा विक्रीसह अवैधधंदे व  गुन्हेगारीने तोंड वर काढले आहे. या धंद्याचा ‘खुर्दा’ करणे नूतन ठाणेप्रमुखांसाठी आव्हानात्मक असणार आहे. 

उपविभागीय अधिकारी माणिक आहेर यांच्यासह तहसीलदार राहुल गायकवाड, पोलिस निरीक्षक संजय लोहकरे या प्रमुख महसूल व पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यानंतर उपविभागीय अधिकारी म्हणून डाॅ.अरुण ज-हाड, तहसीलदार सुनील सावंत, पोलिस निरीक्षक श्यामसुंदर कोठाळे यांच्यासह अन्य काही पोलिस अधिकारी नव्याने वैजापूर येथे रुजू झाले आहेत. याशिवाय गटविकास अधिकारी विठ्ठल हरकळ हे सेवानिवृत झाल्यामुळे हा प्रभारी पदभार कृषी अधिकारी हणमंत बोयनर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. त्यामुळे वैजापुरात सध्या नवा भिडू, नवा राज आहे. तत्कालीन उपविभागीय अधिकारी डॉ. संदिपान सानप यांनी त्यांच्या कार्यकाळात वाळूमाफियांच्या मुसक्या आवळून दंडात्मक कारवाईसह गुन्हे दाखल करून सळो की पळो करून सोडले होते. आता नव्याने रुजू झालेल्या महसूल व पोलिस अधिकाऱ्यांसमोरही हे आव्हान आहेच. गोदापत्रासह अन्य वाळूपट्ट्यातून अवैधरित्या वाळूची तस्करी सुरूच आहे. ढिसाळ व गाफिल प्रशासकीय यंत्रणेचा फायदा घेऊन माफियांनी ‘भर अब्दुल्ला गुड थैली में’ असे म्हणत मोठ्या प्रमाणावर वाळूची तस्करी करीत आहे. याशिवाय शहर परिसरात गौणखनिजांची कोणतीही राॅयल्टी  (स्वामित्व शुल्क ) न भरता सर्रासपणे उचलेगिरी सुरू आहे. स्वामित्व शुल्क भरून बेसुमा उचल केली जाते. त्यामुळे महसूल विभागाचा कारभार म्हणजे ‘अंधेर नगरी चौपट राजा’ असल्यासारखी गत झाली आहे. दगड खदान किती खोदली पाहिजे ? यासाठीही प्रशासनाने नियम ठरवून दिले आहे. परंतु खदानचालकांनी सर्वच नियम धाब्यावर बसविले आहे. गेल्या काही वर्षांत अधिकाऱ्यांनी खदानींची पाहणी केल्याचे ऐकीवात नाही. त्यामुळे खनिजांची किंमत ‘गौण’ झाल्यासारखी परिस्थिती आहे. याशिवाय धान्य तस्करीचा विषयही ऐरणीवर आलेला आहे. या तस्करीसाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची साथ असल्यामुळे तस्करांना ‘सुगीचे’ दिवस आहे. घरातलेच भेदी असल्यामुळे सर्वांचेच फावत आहे. दुसरीकडे वैजापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैधंद्यांनी उच्छाद मांडला आहे. अवैध गुटखा विक्रीसह दारू विक्री, मटका, पत्यांचे अड्डे, चोऱ्यांचे वाढते प्रमाण, गुन्हेगारी आदी बाबींचा विचार नूतन पोलिस अधिकाऱ्यांना करावा लागणार आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अवैधधंद्यांचा पर्दाफाश केल्याच्या अनेक घटना आहे. एकंदरीतच महसूल व पोलिस प्रशासनातील अधिकाऱ्यांसमोर अवैधंद्यांना चाप बसविण्याचे मोठे आव्हान असणार आहे. ही परिस्थिती संबंधित अधिकारी कशी हाताळतात. हे माञ येत्या काही दिवसांत समजणार आहे.

लोहकरे ठरले ‘औट’ घटकेचे ठाणेप्रमुख

उपविभागीय पोलिस अधिकारी कैलास प्रजापती यांच्या सेवानिवृत्तीनंतर साधारणतः सहा महिन्यापूर्वी डीवायएसपी पदाची सूत्रे प्रशिक्षणार्थी सहायक पोलिस अधीक्षक महक स्वामी यांनी घेतली. तसेच पोलिस निरीक्षक संजय लोहकरे हे फेब्रुवारी 2023 मध्ये ठाणेप्रमुखपदी रुजू झाले होते. अवघ्या चार महिन्यांत त्यांची छत्रपती संभाजीनगर येथे बदली करण्यात आल्याने ते ‘औट’ घटकेचे ठाणेप्रमुख ठरले आहेत. बदलीचे कारण प्रशासकीय असले तरी गेल्या काही दिवसांपासून ठाण्याच्या हद्दीत वाढलेली गुन्हेगारी व चोरीच्या घटना पाहता त्यांना अंकुश घालण्यात ते अपयशी ठरले.त्यामुळे  ही खांदेपालट करण्यात आल्याची चर्चा पोलिस दलात आहे.