हुंड्यासाठी विवाहितेचा छळ ; सासरच्या आठ जणांविरुद्ध शिऊर पोलिसात गुन्हा दाखल

वैजापूर ,२४ जानेवारी / प्रतिनिधी :-  हुंड्यासाठी विवाहितेचा छळ करून तिला घराबाहेर काढून दिल्याची घटना तालुक्यातील वडजी येथे घडली.या प्रकरणी पतीसह सासरच्या आठ जणांविरुद्ध शिऊर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील भिवगाव येथील रहिवासी आरती (२५) हिने मार्च २०२० मध्ये वडजी येथील अंकुश निपटे यांच्याशी प्रेम विवाह केला होता.विवाहानंतर पतीच्या घरी नांदायला गेली.मात्र थोड्याच दिवसात सासरच्या मंडळींनी तिला त्रास द्यायला सुरुवात केली.तिच्या नणंदा तिला त्रास द्यायला लागल्या तू आमच्या भावाला शोभत नाही , तू त्याला फसवलं आहे. दुसरीकडे विवाह केला असता तर आम्हाला मानपान,भांडी व हुंडा मिळाला असता असे म्हणून सतत मारहाण व शिवीगाळ करू लागले.या घरात राहायचे असेल तर एक मोटार सायकल व ५० हजार रुपये घेऊन ये अशी मागणी त्यांनी तिच्याकडे केली.मात्र प्रेमविवाह केल्याने तिच्याशी माहेरचे भाऊ,बहीण,आई यांनी संबंध तोडून टाकले होते.त्यामुळे ती मोटार सायकल व रक्कम आणू शकली नाही.या कारणावरून तिचे नऊ महीन्याच्या बाळासह तिला घरातून हाकलून देण्यात आले.

या प्रकरणी आरती निपटे हिने दिलेल्या तक्रारीनुसार  तिचा पती अंकुश भाऊसाहेब निपटे, भाऊसाहेब काशिनाथ निपटे, साखराबाई भाऊसाहेब निपटे सर्व रा.वडजी,मिनाबाई नवनाथ आहेर,नवनाथ मंजाहरी आहेर, वैशाली नवनाथ आहेर सर्व रा.बिलोणी,भारती सतीश सोमासे व सतीश बाजीराव सोमासे रा.रांजणगाव या आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.