वैजापूर उपविभागातील २९ तलाठ्यांची बदली

एकाच ठिकाणी तळ ठोकून असलेल्या तलाठ्यांना उपविभागीय अधिकारी डॉ. जराड यांचा दणका

वैजापूर ,​९​ जुलै / प्रतिनिधी :-शासनाच्या सूचनेनुसार ३० जून रोजी उपविभागात कार्यरत २९ तलाठ्यांची बदलीचे आदेश प्रशासनाने काढले आहे. उपविभागातील वैजापूरचे तलाठी गंगापूर तर गंगापूरचे वैजापूरला हलविण्यात आले आहे. यात संघटनेच्या आजी-माजी पदाधिका-यांचीही बदली झाली हे विशेष. 

वैजापूर शहर व गंगापूर शहराचा पदभार प्रभारी तलाठ्यांकडे सोपविण्यात आला आहे. दरम्यान बदलीच्या यादीत मलईदार सजेच्या तलाठ्यांचा समावेश आहे. हे तलाठी बदलीच्या ठिकाणी हजर होतात की प्रतिनियुक्तीचा खेळ करत माघारी येतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

वैजापूर तालुक्यातील तलाठी गेल्या कित्येक वर्षापासून एकाच ठिकाणी तळ ठोकून आहेत. सेवेत रुजू झाल्यापासून १० ते १२ वर्ष होवूनही या तलाठ्यांची दुसऱ्या तालुक्यात बदली झालेली नाही. त्यामुळे या तलाठ्यांचा मनमानी कारभार वाढला आहे. मधली दोन वर्ष कोविड काळात बदल्या झालेल्या नव्हत्या. त्यातच यंदा शासनाने मे ऐवजी जून अखेरपर्यंत बदल्या करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे एक महिना उशिराने बदली प्रक्रिया पार पडली. अलिकडेच रुजू झालेल्या उपविभागीय अधिकारी डॉ. अरुण जऱ्हाड यांनी शुक्रवारी रात्री उशिरा उपविभागातील २९ सजेच्या तलाठ्यांचे बदल्यांचे आदेश काढले. या बदली प्रक्रियेत तालुक्यातून ११ जण गंगापूरला गेले आहे. तर गंगापूर तालुक्यातील १२ जणांची वैजापुरात बदली करण्यात आली आहे. तर ६ तलाठ्यांची तालुक्यातच गावे बदलली असून चार ४ जणांकडे अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. 

गेल्या वर्षी उपविभागीय अधिकारी माणिक आहेर यांनी प्रशासकीय कारणाने तालुकातर्गत बदल्या केल्या होत्या. मात्र अर्थपूर्ण चर्चेतून मार्ग काढत बदली झालेल्यांनी प्रतिनियुक्तीच्या नावाखाली त्याच ठिकाणी ठाण मांडली होती. त्यामुळे यावेळी निघालेले आदेशाची अमलबजावणी होणार की केवळ कागदी बाण चालवून प्रशासन सोपस्कार पूर्ण करणार याकडे लक्ष लागले आहे. 

तीन दिवसांत हजर न झाल्यास कारवाई – डॉ. अरुण जऱ्हाड 

दरम्यान प्रशासकीय बदली प्रक्रियेत पात्र असलेल्या २९ तलाठ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. या बदली झालेल्यांना अपूर्ण कामे त्वरित पूर्ण करून नव्या सजेवर रुजू होण्यासाठी तीन दिवसांची मुदत दिल्याचे उपविभागीय अधिकारी डॉ.अरुण जऱ्हाड यांनी सांगितले. बदलीच्या ठिकाणी हजर न होणाऱ्यांवर कारवाईची भूमिका घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.  

वैजापूर तालुक्यातील कोल्ही येथील मंगलपोर्णिमा खिल्लारे यांची ( नेवरगाव ), मनेगावचे राजेंद्र खराडकर  (भिवधानोरा ), खंडाळ्याचे प्रकाश गायकवाड  (दहेगाव बंगला ), वीरगावच्या उज्वला ठोंबरे  (डोणगाव ), करंजगावच्या अमिता लांडगे  (माळीवाडगाव ), नांदगावच्या जयनंदा लोखंडे  (वसूसायगाव ), आघूरचे प्रवीण दिलवाले  (काटेपिंपळगाव ), लाडगावचे सुनील सरगर  (शिल्लेगाव ), घायगावचे रविंद्र जोशी ( जांभाळा ), शिऊर भाग एकचे शंकर जाधव ( हर्सूल ), गाढेपिंपळगावचे विनोद साळवे ( सिंधीसिरसगाव ) येथे बदली करण्यात आली आहे. 

तर तालुक्यातील परसोडा येथे मीना मोरे, माळीघोगरगाव येथे सुनील वाघमारे, शिऊर भाग एक येथे जितेंद्र कळसकर, मनेगाव येथे देविदास पावटेकर ,पुरणगाव अमोल काळे, पाथरी येथे रविकांत गहिरे, करंजगाव येथे कल्पना गायसमुद्रे, गाढेपिंपळगाव येथे कांचन वडगावकर , लाडगाव येथे शेख बाबाजानी मोहमद, वीरगाव येथे संदीप पवार, खंडाळा भाग २ येथे सुखदेव राठोड, वैजापूर ग्रामीण दोन येथे कृष्णा गायके बदलून आलेले आहे. या शिवाय तालुक्यातील पारळाचे रामेश्वर पेहरकर (घायगाव),मांडकीचे विनोद क्षीरसागर ( मालेगाव कन्नड ), जातेगावचे बाळासाहेब त्रिभुवन ( मांडकी ), गंगापूर तालुक्यातील झोडेगावचे सुनील ढोले ( डोमेगाव ), हर्सूलचे अमर तोरंबे  (गवळीशिवरा ), मांगेगावचे राजेंद्र सुराळे तांदूळवाडी येथे नियुक्ती देण्यात आली आहे. तर वैजापूर सजेचा अतिरिक्त पदभार गजानन जाधव, धोंदलगावचा दुर्गाप्रसाद फालक, गंगापूर सजेचा पदभार गणेश लोणे, रांजणगाव पोळचा ज्योती तोंडे यांना तात्पुरत्या स्वरुपात सोपविला आहे.