रेल्वेतून प्रवाशाचा चोरट्यांनी हिसकावून नेलेला मोबाईल रेल्वे सेनेच्या दोन युवकांनी पाठलाग करून केला हस्तगत

वैजापूर ,​९​ जुलै / प्रतिनिधी :-रेल्वे प्रवासात रात्री चोरट्यांनी प्रवाशांचा २५ हजारांचा मोबाईल संच लंपास करणा-या चोरट्यांचा रेल्वे सेनेच्या रोटेगाव येथील दोन युवकांनी पाठलाग करुन मोबाईल हस्तगत केला. युवक पाठलाग करत असल्यामुळे चोरटे मोबाईल सोडून अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले. 

या संदर्भात रेल्वे सेनेचे संतोषकुमार सोमाणी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई-नांदेड नंदीग्राम एक्सप्रेस गाडी क्रमांक ११४०१ मधून शंकर कलापाड रा.वाशिम हे मुंबईहून पुर्णाकडे कुंटुबासह जात होते.रोटेगाव जि. छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानक येथे रेल्वे क्राॅसिंग दरम्यान प्रवाशी शंकर कलापाड यांच्याकडील २५ हजार रुपये किंमतीचा मोबाईल अज्ञात चोरट्यांनी हिसकावून नेला. या प्रकाराची महिती त्यांनी  छत्रपती संभाजीनगर रेल्वे पोलीसांना दिल्यानंतर तपासाचे चक्र सुरु केले. या मोबाईल चोरीची महिती रोटेगाव येथील रेल्वे प्रवाशी सेनेचे युवक सिंकदर शेख व सोनु शेख यांना कळवण्यात आल्यानंतर त्यांनी राबवलेल्या शोध मोहिमेत रेल्वे पुलाखालील अंधारात चोरटा लपून बसल्याचे त्यांना दिसून आले. त्याच्याजवळ जाईपर्यत चोरट्यांनी तेथून धूम ठोकली. रेल्वे सेनेचे युवक पाठलाग करत असल्याचे पाहून चोरटा प्रवाशाचा चोरलेला मोबाईल खाली टाकला टाकून अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला.गुरुवारी सकाळी रेल्वे सेने अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी व रेल्वे पोलीस यांनी प्रवासी शंकर कलापाड यांना रोटेगाव रेल्वे स्थानकांचे स्टेशन मास्तर मीना, रेल्वे सेना टीम सदस्य सिकंदर शेख व सोनू आरेफ शेख यांनी VIVO Y कंपनीचा 25 हजार रुपये किंमत असलेला मोबाईल फोन परत केला. मोबाईल मिळवून दिल्याबद्दल रेल्वे सेनेचे अभिनंदन होत आहे.