गौतम बुद्धांच्या अस्थिकलशासह भिक्खू संघाची धम्म पदयात्रा वैजापुरात दाखल ; भव्य स्वागत

वैजापूर ,३१ जानेवारी / प्रतिनिधी :- भगवान गौतम बुद्धांच्या पवित्र अस्थिकलशासह आंतरराष्ट्रीय बौद्ध भिक्खू संघाचे मंगळवारी (ता.31) दुपारी वैजापूर शहरात जोरदार स्वागत करण्यात आले.

तथागत गौतम बुद्धांचा पवित्र अस्थिकलश घेऊन  थायलंड येथील आंतरराष्ट्रीय भिक्खू संघ व प्रसिद्ध सिने अभिनेता गगन मलिक, सिद्धार्थ हत्तीअंबिरे,  यांच्यासह उपासकांची धम्म पदयात्रा वैजापूर शहरात पोहचल्यानंतर विविध मार्गावर ‘या पदयात्रेचे स्वागत व अस्थिकलशाचे दर्शन उपलब्ध करुन देण्यात आले. स्थानिक उपासक-उपासिकांनी यासाठी जय्यत तयारी केली होती. भिक्खू शाक्यपुत्र अमृतानंद बोधी, पोलीस उपअधीक्षक प्रविण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली येथील जिल्हा परिषद मुलांची शाळा मैदानावर  भिक्खू संघ व त्यांच्या सोबतचे उपासक आज मुक्कामी राहणार आहेत. याठिकाणी सांयकाळी आठ वाजता उपस्थित उपासक बांधवाना धम्म देसना देण्यात आली. ही धम्म पदयात्रा परभणीहून निघाली असून चैत्यभूमी (दादर) मुंबई येथे जाणार आहे. यात एकशे दहा थायलंड येथील आंतरराष्ट्रीय भिक्खू तसेच भारतातील भिक्खू संघ, उपासक आदींचा सहभाग आहे. ही पदयात्रा मंगळवारी वैजापूरात दाखल झाली असून एक फेब्रुवारीला सकाळी येवला या ठिकाणी प्रस्थान करणार आहे.

शहरातील उपासक, उपासिकांनी बुद्धांच्या अस्थींचे दर्शन आणि धम्मदेसनेचा लाभ घेतला.

वैजापूर तालुक्यातील सर्व सामाजिक, राजकीय  शैक्षणिक, आंबेडकरी चळवळीतील सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते अधिकारी , शिक्षक बंधू भगिनी, उपासक ,उपासिका , युवक, युवती आदींनी धम्म पदयात्रेचे जोरदार स्वागत केले. 

प्राचीन वारसा

तथागत भगवान गौतम बुद्ध-अस्थिधातू एक ऐतिहासिक धम्मप्रचार वारसा

जन्म -इ.स.पू.- 583 वर्षे 

महापरिनिर्वाण-इ.स.पू.- 463 वर्षे 

महापरिनिर्वाण होऊन  2 हजार 486 वर्षे झाली आहेत.तरीही आजपर्यंत थायलंड येथील राजे व थायलंड येथील भिक्खू संघ यांनी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या अस्थिधातू आजही जतन करून ठेवल्या असून ही पवित्र व पावन स्मृती अतिशय पावित्र्य राखून जतन केलेली आहे.हा ऐतिहासिक धम्मप्रचार  वारसा  तर आहेच पण वैजापूर तालुक्यासाठी सर्वांत आश्चर्यकारक व अद्भुत घटनासुद्धा आहे. या अस्थिधातू सुवर्ण कलशा मध्ये 2486 वर्षापासून जतन करून ठेवणे हे पिढ्यान् पिढ्यां थायलंड भिक्खू संघाकडून प्रचार आणि प्रसारामुळे शक्य झाले आहे. 31 जानेवारीला वैजापूर तालुक्यात हा अस्थीकलश घेऊन महाधम्म पदयात्रा  करत 110 थायलंड भिक्खू संघ दाखल झाला असून प्रत्यक्ष डोळ्यांनी तथागत गौतम बुद्धांचे अस्थिधातूचे दर्शन वैजापूरवासियांना झाले. थायलंड येथील मुख्य भन्ते कोविंद,भन्ते सत्यपाल यांनी उपदेश दिला.