अभियंता कृष्णा दळेचा सार्थ अभिमान वाटतो – पद्माकरराव मुळे  

खोदकामात सी. एस. एम. एस. एस. छत्रपती शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्याचे योगदान

छत्रपती संभाजीनगर ,१ डिसेंबर / प्रतिनिधी :-उत्तराखंडमधील सिलक्यारा बोगद्यामध्ये गेल्या १६ दिवसांपासून अडकलेल्या मजुरांची मंगळवारी सुखरूप सुटका करण्यात आली. सुटका करत असताना अंतिम टप्प्यात “रॅट होल मायनिंग’ पद्धतीचा वापर यशस्वी ठरला असून त्यामुळे मजुरां पर्यंत पोहोचणे शक्य झाले आहे. सदर पद्धतीमध्ये मातीमध्ये अडकलेल्या ब्लेड कट करून मजुरांना बाहेर काढण्यात मदत झाली. सदर ब्लेड कट करण्याचे काम कांचनवाडी स्थित असलेल्या  छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेच्या छत्रपती शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी कृष्णा भाऊसाहेब दळेचे योगदान लाभले आहे.

बोगद्यात अडकलेल्या ४१ कामगारांना बाहेर काढण्यासाठी जगभरातील तज्ञ तंत्रज्ञानाची मदत घेण्यात येत होती.  या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये पुण्यातील “सुरेश इंदू लेझर प्रायवेट लिमिटेड” कंपनीच्या टीमला पाचारण करण्यात आले.  त्यात कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक वर्धमान शहा व त्यांची टीमचे योगदान लाभले. यात त्यांची संपूर्ण टीम तीन दिवस बोगद्यात मुक्कामी होती. त्यात अॅप्लिकेशन इंजिनियर कृष्णा भाऊसाहेब दळे याचाही सहभाग होता. कृष्णा दळे हा वाहेगाव, ता. पैठण येथील रहिवासी असून त्याचे वडील कुंभार व्यवसाय तसेच शेती करतात तर आई सौ. मंदाबाई या घरकाम आणि मजुरी करतात. कृष्णाचा लहान भाऊ शिक्षण घेत असून एक बहीण विवाहित आहे. वडिलांना व्यवसायात हातभार लावून त्याने अभियांत्रिकीमध्ये मेकानिकल इंजिनीरिंगची पदवी प्राप्त केली. त्याने 

 छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेच्या छत्रपती शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयातून २०१७ मध्ये पदवी पूर्ण केलेली आहे. पदवी शिक्षणादरम्यान कृष्णा नेहमी सर्व तांत्रिक स्पर्धामध्ये सहभाग घेत असे. तसेच शैक्षणिक सत्रामध्ये तो विद्यापीठ परीक्षामध्ये अव्वल क्रमांकावर उत्तीर्ण झालेला आहे. कृष्णा सध्या “सुरेश इंदू लेझर प्रायवेट लिमिटेड” कंपनी, पुणे येथे मागील दोन वर्षापासून अॅप्लिकेशन इंजिनियर म्हणून काम करत आहे. त्यात त्याने विविध प्रकल्पावर काम केलेले आहे. बोगद्यामध्ये खोदकाम करताना ऑक्सिजनचे प्रमाण अत्यंत कमी आणि अल्प होते. तसेच बोगद्यामध्ये मशीनला जाण्यास अडथळा होता. त्यामुळे मशीनचे वेगवेगळे पार्ट करून सदरील मशीन बोगद्यामध्ये नेण्यात आली. तसेच त्यासोबत कृष्णानी स्व:त बोगद्यामध्ये उतरून मशीनचे प्रात्यक्षिक करून दाखवले. त्याने स्वत कंपनीच्या प्लाझमा कटिंग मशीनच्या साह्याने खोदकामातील अडथळे दूर केले. शैक्षणिक सत्राच्या अंतिम वर्षात शिकत असताना त्याने हिट ट्रान्स्फर संबधित विषयावर प्रोजेक्ट सादरीकरण केले होते, त्याचा फायदा त्याला या बचाव मोहिमेमध्ये झाला.            

कृष्णाच्या या कामगिरीबद्दल महाविद्यालयाचे अध्यक्ष श्री. रणजित मुळे, सचिव श्री. पद्माकरराव मुळे, प्रशासकीय अधिकारी डॉ. श्रीकांत देशमुख, प्राचार्य डॉ. उल्हास शिंदे, उपप्राचार्य डॉ. देवेंद्र भुयार, मेकानिकल विभागाचे विभागप्रमुख डॉ. रामचंद्र चोपडे, प्रा. सचिन लहाने  यांनी कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

———————————-     

तरुण इंजिनीयर घडवण्यासाठी आम्ही वचनबध्द

आमचा विश्वास आहे कि, विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्य घडवण्यात महाविद्यालयांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण असते. कोर्पोरेट जगतातल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि जबाबदाऱ्या पेलण्यासाठी तयार असलेला तरुण इंजिनीयर घडवण्यासाठी आम्ही वचनबध्द आहोत. विद्यार्थी केंद्रित शिक्षणासोबतच आम्ही त्यांच चारित्र्य घडवण्यासाठी तसेच नैतिक
मूल्यांची जपवणूक करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.भविष्यातील अडचणी आणि आव्हाने यांना सामोरे कसे जावे, याबद्दलची शिकवण आणि प्रशिक्षण आम्ही सातत्याने विद्यार्थाना देत असतो. कृष्णा दळे यांनी या मोहिमेत खारीचा वाटा उचलून छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था आणि देशाचे नाव उंचावले. त्यांचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. यापुढेही आमचे विद्यार्थी आणखीन कठीण परिस्थितीचा सामना करून यश संपादन करतील अशी खात्री आणि ठाम विश्वास वाटतो.  

पद्माकरराव मुळे ,सचिव,छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था