काँग्रेसने देशाचे वाटोळे केले, मोदींचा विरोधकांवर घणाघात

मी शरद पवारांना कायमच आदरणीय नेते मानतो-पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : राज्यसभेतील आजच्या भाषणावेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचा चांगलाच समाचार घेतला. काँग्रेसने देशाचे वाटोळे केले. देशाच्या प्रश्नांवर कायमस्वरुपी तोडगा काढण्याऐवजी काँग्रेसने ६० वर्षात केवळ खड्डेच खड्डे खोदून ठेवले आहेत, अशी टीका मोदी यांनी सभागृहात केली.

मोदी पुढे म्हणाले, आमच्या सत्ताकाळात आम्ही देशातील अडचणींवर कायमचा उपाय शोधण्याचा प्रयत्न केला आहे. अडचणींपासून पळण्याची आमची वृत्ती नाही. आम्ही त्यावर उपाय शोधणारे आहोत.

देशात काँग्रेसचं सरकार असताना कशाप्रकारे वेगवेगळ्या राज्यांची सरकारं पाडली गेली, हे सांगताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांचं कौतुक केलं आहे.

‘काँग्रेसच्या एका पंतप्रधानाने राष्ट्रपती राजवटीचा 50 वेळा वापर केला, त्यांनी याचं अर्धशतकच केलं, त्यांचं नाव होतं इंदिरा गांधी. केरळमध्ये स्थापन झालेलं डाव्यांचं सरकार पंतप्रधान नेहरूंना आवडत नव्हतं, म्हणून त्यांनी केरळचं सरकार पाडलं. आज तुम्ही तिकडे आहात, पण तुमच्यासोबत काय झालं ते आठवा,’ असं म्हणत पंतप्रधानांनी डाव्यांनाही टोला हाणला.

यावेळी विरोधकांनी ‘मोदी-अदानी भाई भाई’ अशी घोषणाबाजी केली. तर सत्ताधाऱ्यांनी मोदींना पाठिंबा दर्शवला. पण या गोंधळात मोदींनी आपले भाषण सुरुच ठेवले.पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “गेल्या ९ वर्षांमध्ये आम्ही देशातील अडचणींवर कायमचा उपाय शोधण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही अडचणींपासून दूर पाळणारे नाही, तर त्यावर उपाय शोधणारे आहोत.” असे म्हणत त्यांनी विरोधकांना टोला लगावला. यावेळी विरोधकांचा अधिक समाचार घेत मोदींनी देशात कमळ फुलवण्यात विरोधकांचं मोठं योगदान आहे, असा टोला लगावला. विरोधक जितके चिखल फेकतील तितकेच कमळ चांगले फुलेल, असे मोदी म्हणाले.

मी शरद पवारांना कायमच आदरणीय नेते मानतो. 1980 मध्ये शरद पवारांचं वय 35-40 होतं. एक तरुण मुख्यमंत्री महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी निघाला होता. त्यांचं सरकारही पाडण्यात आलं. आज तेही तिकडे आहेत, असं नरेंद्र मोदी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बोलत असताना शरद पवार सभागृहात उपस्थित होते.

तामीळनाडूमध्ये एमजीआर आणि करुणानिधी यांचं सरकार काँग्रेसनं राष्ट्रपती राजवट लाऊन बरखास्त केलं. एमजीआर यांचा आत्मा वरून पाहत असेल, तुम्ही कुणाच्या बाजूने उभे आहात. एनटीआर यांच्यासोबत काय झालं? एनटीआर अमेरिकेमध्ये उपचारासाठी गेले होते, तेव्हा त्यांचं सरकार पाडण्यात आलं. प्रत्येक प्रादेशिक नेत्याला काँग्रेसने त्रास दिला आहे, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत बोलताना केला.

राज्यसभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यावर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, खर्गेजी! फक्त कर्नाटकमध्ये एक कोटी ७० लाख जनधन बँक खाती उघडली आहेत. इतकेच नाही, त्यांच्याच कलबुर्गीमध्ये आठ लाखांपेक्षा जास्त जनधन खाती उघडण्यात आली आहेत. इतकी बँकेची खाती उघडली त्यामुळे लोक इतके जागरुक होत असतील तर आता कुणाचं खातं बंद होत असेल तर काय करायचं.. असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खर्गे यांना लगावला.