केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी भूविज्ञान मंत्रालयाचा पदभार स्वीकारला

नवी दिल्ली,​१९​ मे / प्रतिनिधी:- केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी आज सकाळी भूविज्ञान मंत्रालयाचा पदभार स्वीकारला.  2047 पर्यंत भारताला विकसित देश करण्याच्या संकल्पामध्ये हे मंत्रालय मोलाची भूमिका पार पाडेल असे सांगून इतक्या महत्वपूर्ण मंत्रालयाचा कार्यभार आपल्याकडे सोपवल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.

समृद्ध खनिजे असलेल्या पॉलिमेटॅलिक नोड्यूलच्या शोधासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील महत्वाकांक्षी योजना, खोल सागरातील मोहीम (डीप ओशन मिशन) कार्यान्वित करण्याला आपले प्राधान्य असेल असे रिजिजू यांनी पदभार स्वीकारल्यानंतर वार्ताहरांशी बोलताना सांगितले.

आपल्या मंत्रालयाच्या प्रत्येक निर्णयाचा सामान्य माणसाला काहीतरी उपयोग व्हावा असा आपला दृष्टिकोन असेल कारण गोष्टी सोप्या आणि सुलभ करण्यावर आपला नेहमीच विश्वास आहे, असे ते म्हणाले.

रिजिजू यांनी भारतीय हवामान विभाग,आयएमडीसह मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांच्या एका संक्षिप्त सादरीकरणाचे अध्यक्षस्थान भूषवले आणि येत्या काही दिवसांत ते संपूर्ण “हवामान अंदाज प्रणाली” चा पुन्हा आढावा घेतील, असे त्यांनी सांगितले. 

शालेय जीवनापासूनच आपल्याला पृथ्वी, हवामानशास्त्र आणि  नकाशे तयार करण्याच्या क्षेत्रात खूप कुतूहल आणि जिज्ञासा होती  आणि आता आपल्याला या नवीन क्षेत्रात नक्कीच काम करायला आवडेल, असेही ते  म्हणाले.