गाढेपिंपळगाव येथे तीन पोल पडल्याने वीज पुरवठा खंडित ; फिल्टर व पिठाची गिरणी बंद पडल्याने नागरिकांची गैरसोय

वायरमनचा पत्ताच नाही, वीज वितरण अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष 

वैजापूर ,​९​ जुलै / प्रतिनिधी :-वैजापूर तालुक्यातील गाढेपिंपळगांव येथे शेतातील 11 केव्ही चे तीन पोल पडल्याने गेल्या तीन दिवसांपासून वीज पुरवठा बंद असून लाईट नसल्याने पाणी पुरवठा योजनेचे फिल्टर व गावातील पिठाची गिरणी बंद असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. वीज वितरण अधिकाऱ्यांचेही दुर्लक्ष होत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

गाढेपिंपळगांव येथील शेतकरी वेणुगोपाल नेमाने यांच्या शेतातील 11केव्ही चे 3 तीन पोल पडल्याने गेल्या तीन दिवसांपासून गावात व शेतात लाईट नाही. लाईट नसल्यामुळें गावातील फिल्टर बंद आहे. त्यामुळे पिण्यासाठी पाणी नाही तसेच पिठाची गिरणीही बंद असल्याने पीठ नाही. त्यामुळे गावातील व शेत वस्तीवरील  नागरीकाची गैरसोय होत आहे . लाईट नसल्याने सर्व मोबाईलही बंद असून कुणाशीही संपर्क होत नाही. 

गावात वायरमन येतच नाही.त्यामुळे वायरमन कोण आहे हेही गावातील लोकांना माहीत नाही. फोन केला तर वायरमन हा अरेरावी करतो. गावातील लाईट चे सर्व काम आमच्या गावातील मुलच करतात असे गावांतील लोकांचे म्हणणे आहे.गावात सिंगल फेजच्या दोन डि.पी.आहेत पंरतु यामधील तीन 25 चे ट्रान्सफार्मर जळालेले आहे. यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रातील औषध खराब होतात असेही लोकांनी सांगितले. वीज वितरणच्या या गलथान कारभारामुळे गावातील नागरिकांची गैरसोय होत आहे.अशी तक्रार गाढेपिंपळगांव येथील ग्रामस्थांनी केली आहे.