विहिरी व घरकुलांचे मंजुरीचे प्रमाण जास्त आहे पण पूर्ण  होण्याचे प्रमाण कमी-आ.रमेश पाटील बोरणारे 

वैजापूर ,२४ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- वैजापूर तालुकास्तरीय सरपंच परिषद आढावा बैठक आ.रमेश पाटील बोरणारे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी येथे पार पडली.वैजापूर पंचायत समितीच्या कै. विनायकराव पाटील सभागृहात आयोजित याबैठकीत घरकुल, जलजीवन, शिक्षण, आरोग्य, रोजगार हमी अंतर्गत विहिरी, गोठे, शेततळे, मातोश्री पाणंद रस्ते याविषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

या बैठकीत मार्गदर्शन करताना आ. बोरणारे म्हणाले, तालुक्यात विहिरी व घरकुलांचे मंजुरीचे प्रमाण जास्त आहे पण पूर्ण होण्याचे प्रमाण कमी आहे तरी सर्व सरपंच ग्रामसेवक यांनी जबाबदारी घेतली पाहिजे, सरपंच व ग्रामसेवकांनी किमान वर्षातून चार ग्रामसभा घेणे आवश्यक आहे व आठवड्यातून तीन वेळा तरी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये बसावे जेणे करून ग्रामस्थांची कामे थांबणार नाही. सरपंच व ग्रामसेवक यांनी अपूर्ण घरकुलं पूर्ण कसे होतील याच्या मागे लागून पूर्ण करावी. ज्या लाभार्थीना घरे बांधली नसेल त्यांच्या समन्वय साधून ती अपूर्ण घरे पूर्ण करा.तसेच ग्रामपंचायतीमध्ये अनेक योजना असून त्या समजावून घेणं आवश्यक आहे, तुम्ही गावाचे सरपंच आहे त्यामुळे कोणताही पक्षपात न पाहता लाभार्थ्यांची अडवणूक न करता कामे करा. तुमच्या कार्यकाळात असे काम करा की, कार्यकाळ संपल्यानंतर जाता जाता निदान गावातल्या लोकांनी नाव घेतलें पाहिजे असे आमदार बोरणारे यांनी सरपंचांना मार्गदर्शन करत सूचना दिल्या.

प्रधानमंत्री आवास, शबरी आवास, रमाई आवास योजने अंतर्गत घरकुल मंजूर असलेल्या ज्या लाभार्थ्यांना घरकुलासाठी जागा नाहीय त्या सर्व लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून द्यावी जेणे करुन गोरगरिबांचा नागरिकांचा आशीर्वाद मिळेल अशी विनंती आ. बोरणारे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मिना यांना यावेळी बोलताना केली.

या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मिना, सहायक मुख्य कार्यकारी अधिकारी केंद्रे साहेब, गटविकास अधिकारी विठ्ठल हारकळ, कृषी अधिकारी प्रकाश देशमुख, शिक्षणाधिकारी श्रीमती चव्हाण , तालुका आरोग्य अधिकारी डॉ. इंदुरकर, उपकार्यकारी अभियंता कोयलवार यांच्यासह सरपंच, ग्रामसेवक, पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.