वैजापूर येथे ‘हाथ से हाथ जोडो’ अभियानच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची बैठक

वैजापूर ,२३ मार्च / प्रतिनिधी :- काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी संपुर्ण देशात काढलेल्या तीन हजार पाचशे किमीच्या ऐतिहासिक ‘भारत जोडो’ यात्रेदरम्यान आलेले अनुभव व देशातील सद्य परिस्थितीबाबत सर्वसामान्य जनतेचे मत पोहचवण्यासाठी जिल्हा काँग्रेसतर्फे संपुर्ण तालुक्यात 30 मार्चपर्यंत ‘ हाथ से हाथ जोडो’ अभियान राबवण्यात येणार आहे.‌

प्रत्येक गावात घरोघरी माहितीपत्रकाचे वाटप करुन दारावर स्टिकर्स चिकटण्यात येणार आहेत. यासाठी कॉग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हे अभियान प्रभावीपणे राबवून जनजागृती करावी असे आवाहन जिल्हा काँग्रेस  समितीचे अध्यक्ष डॉ.‌कल्याण काळे यांनी गुरुवारी वैजापूर येथे केले. या अभियानाच्या पार्श्वभुमीवर वैजापूर मर्चंट को- ऑपरेटिव्ह बॅंकेच्या सभागृहात गुरुवारी तालुका काँग्रेस  समितीची बैठक घेण्यात आली. औरंगाबाद येथे दोन एप्रिल रोजी होत असलेल्या महाविकास आघाडीच्या सभेत प्रमुख नेत्यांचे मार्गदर्शन होणार असुन या बैठकीसाठी तालुक्यातुन पाच हजार कार्यकर्ते जाणार आहेत असे त्यांनी सांगितले. या बैठकीला जिल्हा सरचिटणीस किरण डोणगावकर, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब संचेती, तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील सदाफळ, सागर थोट, सुभाष तांबे, शहराध्यक्ष काजी मलिक, विकास सोमवंशी, सुनिल बोडखे, बाबासाहेब गायकवाड, प्रदीप जाधव, मधुकर साळुंके, सुशील आसर, रोहित आहेर, दिगंबर वाघचौरे, साहेबराव पडवळ, सय्यद हिकमत यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलतांना डॉ.‌काळे यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टिका केली.‌ मोदींच्या काळात व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आली असुन विरोधात बोलण्याऱ्यावर चौकशीचा ससेमिरा लावायचा हे धोरण चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले. आज देशात शेतीमालाचे भाव पडले आहेत, महागाई वाढली आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे.‌ अनेक गुन्हे करणारे मोकाट फिरत आहेत. मात्र एखाद्या छोट्या विधानासाठी राहुल गांधींना शिक्षा केली जाते. यावेळी सफल त्रिभुवन, शंकर पहिलवान, अल्ताफ बाबा, प्रवीण जाधव, काजी सलीम, लक्ष्मण पवार, घोगरे पाटील आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

बाजार समितीसाठी स्वतंत्र पॅनल

वैजापूर कृषि उत्पन्न बाजार समितीची निवडणुक कॉग्रेस स्वतंत्रपणे लढविणार असून त्यासाठी स्वतंत्र पॅनेल उभे करण्यात येणार आहे. मात्र समविचारी पक्षांचाही नंतर विचार करण्यात येईल. औरंगाबादच्या सभेसाठी वैजापूर तालुक्यातुन पाच हजार कार्यकर्ते जाणार असुन गाड्यांचे नियोजन करण्यात येईल असे माजी नगराध्यक्ष बाळासाहेब संचेती यांनी सांगितले.