वैजापूर शहर व परिसरात दुसऱ्या दिवशीही जोरदार पाऊस ; ४ जुलैपर्यंत ३६६​​ मिलिमीटर पावसाची नोंद

बोरसर मंडळात सर्वाधिक 147 मिलीमीटर पाऊस 

वैजापूर ,​५​ जुलै / प्रतिनिधी :-वैजापूर शहर व तालुक्याच्या ग्रामीण भागात मंगळवारी व बुधवारी झालेल्या दमदार पावसाने नदी नाले वाहिले.‌ त्यामुळे शेतकरी वर्ग आनंदीत झाला आहे. बोर नदी दुथडी भरुन वाहत आहे. सर्व तहसील मंडळात चांगल्या पावसाची नोंद झाली असून ४ जुलैपर्यंत तालुक्याच्या बारा महसुल मंडळात सरासरी ३६६​ मिमी पावसाची नोंद झाली.

बुधवारी (ता.05) सायंकाळी शहरासह तालुक्यात सर्वत्र धुव्वाधार पाऊस पडला. त्यामुळे नदीनाले भरभरुन वाहिले. बोरसर परिसरात ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने तहसीलदार सुनिल सावंत यांनी महसुलचे पथक त्या भागात पाठवले असून त्या ठिकाणी कुठलीही हानी झाली नसल्याचे त्यांनी सांगितले.‌ कृषि अधिकाऱ्यांना सोबत घेऊन लवकरच या भागाचा दौरा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आतापर्यंत बोरसर मंडळात सर्वाधिक 147 मि.मी.पावसाची नोंद झाली असून लासुरगांव मंडळात (146 मि.मी.) खंडाळा मंडळात (120 मि.मी.) शिऊर मंडळात (106 मि.मी.) महालगाव मंडळात (86 मि.मी.) गारज मंडळात (74 मि.मी.) नागमठाण मंडळात (69 मि.मी.) घायगाव मंडळात (65 मि.मी.) वैजापूर मंडळात (63 मि.मी.) लोणी मंडळात (43 मि.मी.) व बाबतरा मंडळात (40 मि.मी.) पावसाची नोंद झाली. जानेफळ मंडळात आतापर्यंत सर्वात कमी 12 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. मंगळवारी बोरसर, लासुरगांव व शिऊर मंडळात 65 मि.मी. पेक्षा जास्त पाऊस पडला आहे. बुधवारी सायंकाळी सर्व भागात विजेच्या कडकडाटासह पाऊस पडला. रात्री उशीरापर्यंत पावसाची रिमझिम सुरु होती.