भारत मागे पडू शकत नाही कारण तुमचा विजय क्रीडा क्षेत्रातील पुढच्या कित्येक पिढ्यांना प्रेरणादायक आहे-पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधानांनी थ़ॉमस चषक आणि उबेर चषक विजेत्या संघाशी साधला संवाद

पंतप्रधानांनी दूरध्वनीवरील चर्चेत आश्वासन दिल्याप्रमाणे बाल मिठाई आणल्याबद्दल लक्ष्य सेनला धन्यवाद दिले

नवी दिल्ली ,२२ मे /प्रतिनिधी :-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बॅडमिंटनच्या थॉमस चषक आणि उबेर चषक विजेत्या संघांशी संवाद साधला. यावेळी संघाने थॉमस चषक आणि उबेर चषकातील आपले अनुभव सांगितले. खेळाडूंनी त्यांच्या खेळाच्या विविध पैलूंविषयक,बॅडमिंटनच्या पलिकडे आयुष्य आणि अनेक विषयांवर चर्चा केली.

Image

पंतप्रधानांनी इतक्या अभिमानास्पद पद्धतीने प्रत्येक खेळाडूला ओळखल्याबद्दल किदांबी श्रीकांतने किती छान वाटत आहे, याबद्दल सांगितले. पंतप्रधानांनी संघाच्या कर्णधाराला त्याची नेतृत्वशैली आणि आव्हानांबद्दल विचारले. श्रीकांत म्हणाला की, वैयक्तिकरित्या प्रत्येकच जण अत्यंत चांगला खेळत होता आणि संघ म्हणून त्यांच्यातील सर्वोत्कृष्ट बाहेर काढण्याची जबाबदारी होती. निर्णायक आणि अत्यंत महत्वाच्या सामन्यात खेळण्याचे भाग्य लाभल्याबद्दल त्याने आनंद व्यक्त केला. आपले जागतिक क्रमवारीतील अव्वल स्थान आणि थॉमस चषकातील सुवर्णपदक याविषयी विचारले असता, हा निष्णात बॅडमिंटनपटु म्हणाला की, दोन्ही मैलाचे दगड गाठणे हे आपले स्वप्न होते आणि दोन्ही आपण साध्य केल्याचा आनंद आहे. पंतप्रधान म्हणाले की याआधीच्या वर्षांत, फार चांगला खेळ होत नसल्यामुळे थॉमस चषकाबद्दल देशात फारसे बोलले जात नव्हते आणि म्हणून या संघाने मिळवलेल्या प्रचंड यशाची खरी कल्पना येण्यास देशाला थोडासा वेळ लागेल, असेही ते म्हणाले.

Image

पंतप्रधान म्हणाले की, संपूर्ण देशाच्या वतीने मी तुमचे आणि तुमच्या संघाचे अभिनंदन करतो कारण अनेक दशकांनंतर,  भारतीय तिरंगा रोवला गेला आहे. हे काही लहान यश नाही. प्रचंड दबावाखाली मनोधैर्य शाबूत ठेवून संघाला एकत्र ठेवणे हे मीही अत्यंत चांगल्या रितीने समजू शकतो. मी तुमचे अभिनंदन दूरध्वनीवरून केले पण आता मला व्यक्तिशः तुमची प्रशंसा करताना आनंद होत आहे.

सात्विक साईराज रांकीरेड्डीने अखेरच्या दहा दिवसांतील उत्साह आणि कष्ट यांची माहिती दिली. संघाकडून आणि कर्मचारीवर्गाकडून सतत मिळालेल्या संस्मरणीय पाठिंब्याची आठवण त्याने काढली. तो म्हणाला की संघ अजूनही विजयाच्या क्षणांमध्येच जगतो आहे. पंतप्रधानांनी त्यांना कसा आनंद झाला होता, हे सांगून त्यांनी विजयी संघातील सदस्यांनी केलेले ट्विट्स ज्यात त्यांनी आपण पदकांसहच कसे झोपलो होतो आणि आनंदात झोपही येऊ शकली नाही, याचे स्मरण करून दिले. रांकीरेड्डीने आपल्या प्रशिक्षकांनी घेतलेल्या आपल्या कामगिरीचा आढावा स्पष्ट करून सांगितला. पंतप्रधानांनी बदलत्या परिस्थितीनुसार परिस्थितीशी जुळवून घेण्याच्या त्याच्या क्षमतेची प्रशंसा केली. उज्वल भविष्यातील उद्दिष्टांबद्दल पंतप्रधानांनी शुभेच्छाही दिल्या.

चिराग शेट्टीनेही स्पर्धेच्या प्रवासाची कथा सांगितली आणि ऑलिंपिक संघाबरोबर आपण पंतप्रधानांच्या निवासस्थानी आलो असतानाच्या आठवणी काढल्या. पंतप्रधानांनी त्यावेळी काही खेळाडुंना पदक न मिळाल्याबद्दल निराश वाटत असल्याचे नमूद केले. तरीसुद्धा, त्यांनी खेळाडुंचा पदक मिळवण्याचा निर्धार होता आणि आता त्यांनी त्यांच्याकडून असलेल्या सर्व अपेक्षा खर्या केल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.  एक पराभव म्हणजे काही शेवट नाही. त्यासाठी निर्धार लागतो  आणि आयुष्यात तीव्र भावना लागते. अशा लोकांसाठी विजय ही नैसर्गिक परिणाम असतो आणि तुम्ही ते दाखवून दिले आहेत, असे ते म्हणाले. पंतप्रधानांनी संघाला सांगितले की, पुढील काळात ते आणखी कित्येक पदके जिंकतील. त्यांना खूप खेळायचे आहे आणि फुलायचे आहे. (खेलना भी है और खिलना भी है). आणि देशाला क्रीडाविश्वात नव्या उंचीवर घेऊन जायचे आहे. आता भारत पिछाडीवर राहू शकत नाही. क्रीडा विश्वातील पुढच्या  पिढ्यांना तुमचे विजय प्रेरणादायक असतील, असे पंतप्रधानांनी  सांगितले.

Image

स्पर्धेतील विजयानंतर लगेचच पंतप्रधानांशी झालेल्या दूरध्वनी संवादात दिलेल्या वचनाचे पालन करत लक्ष्य सेन याने ‘बाल मिठाई’ आणल्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे आभार मानले. युवा ओलंपिक स्पर्धेतल्या विजयानंतर  पंतप्रधानांची भेट घेतल्याच्या आठवणी जागवत लक्ष्यने थॉमस चषक विजयानंतर पुन्हा पंतप्रधानांच्या भेटीबद्दल आनंद व्यक्त केला. पंतप्रधानांच्या भेटीमुळे खेळाडूंचा उत्साह द्विगुणीत होत असल्याचे लक्ष्य सेन यावेळी म्हणाला. भविष्यातही भारतासाठी अनेक पदके जिंकून पंतप्रधानांची भेट घेत राहण्याची इच्छा विजेत्या लक्ष्य सेन याने व्यक्त केली. या स्पर्धेदरम्यान लक्ष्य सेन याला अन्नातून विषबाधा झाली होती, त्याचीही पंतप्रधानांनी आस्थेने चौकशी केली. विविध क्रीडा प्रकारात भवितव्य घडवू इच्छिणाऱ्या क्रीडापटूंनी खेळाच्या प्रशिक्षणावर संपूर्ण लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला लक्ष्य सेन याने याप्रसंगी दिला. अन्नातून विषबाधा होण्याच्या घटनेला तोंड देताना दाखवलेले संतुलन आणि सामर्थ्य कायम स्मरणात ठेवून या घटनेतून धडा घेत लक्ष्यने स्वतःला आणखी बळकट करावे असा सल्ला पंतप्रधानांनी त्याला दिला.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात आपल्या संघाने मानाची स्पर्धा जिंकणे हा मोठा गौरवास्पद क्षण आहे असे एच. एस. प्रणॉय यावेळी म्हणाला. प्रणॉय म्हणाला की, स्पर्धेच्या उप-उपांत्य आणि उपांत्य फेरीत तो प्रचंड तणावाखाली होता मात्र संघाच्या पाठिंब्यामुळेच तो विजय मिळवू शकला. प्रणॉयमधली लढवय्यी वृत्ती  विजयाप्रति आसक्ती हेच त्याचे खरे सामर्थ्य आहे असे मत पंतप्रधानांनी  व्यक्त केले.

पंतप्रधानांनी विजयी चमूची सर्वात लहान सदस्य उन्नति हूडा हिचे देखील अभिनंदन केले. पंतप्रधान कधीही पदक विजेते खेळाडू आणि इतर खेळाडूंमध्ये भेदभाव करत नाही याबद्दल उन्नतीने पंतप्रधानांचे आभार मानले. पंतप्रधानांनी उन्नतीच्या दृढनिश्चयाचे कौतुक करत हरियाणाच्या मातीच्या कोणत्या वैशिष्ट्यांमुळे तिथे इतके क्रीडापटू तयार होतात याची चौकशी केली. यावर ‘हरियाणाचे दुध-दही’ असे मिश्किल उत्तर उन्नतीने दिले. भविष्यात उन्नती तिच्या नावाप्रमाणेच चमकेल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. उन्नतीची अजून मोठी कारकीर्द घडायची आहे त्यामुळे तिने विजयामुळे संतुष्ट राहू  नये असा सल्ला पंतप्रधानांनी दिला.

या विजयी क्रीडा प्रवासात आपल्या कुटुंबाने नेहमीच भक्कम पाठिंबा दिला असल्याचे त्रिसा जॉली हिने पंतप्रधानांना सांगितले. उबेर चषक स्पर्धेत भारतीय महिला संघाने केलेल्या कामगिरीचा देशाला अभिमान आहे असे पंतप्रधान यावेळी म्हणाले.

थॉमस चषक स्पर्धेतल्या या संघाच्या विजयाने देशात उत्साहाची नवी लाट संचारली आहे असे पंतप्रधान म्हणाले. या विजयामुळे गेल्या 7 दशकांची विजयाची प्रतिक्षा संपली आहे. बॅडमिंटन या क्रीडा प्रकारात रुची असणाऱ्या प्रत्येकाचे थॉमस चषक जिंकणे हे स्वप्न या संघाने पूर्ण केले आहे. या विजयांमुळे देशातल्या क्रीडा क्षेत्रात नवीन ऊर्जा आणि आत्मविश्वास निर्माण होतो. नेत्यांच्या प्रोत्साहनामुळे किंवा प्रशिक्षकांच्या प्रशिक्षणामुळे साध्य न होणारी कामगिरी तुमच्या संघाच्या विजयामुळे पूर्ण होईल अशा शब्दांत पंतप्रधानांनी संघाचा गौरव केला.

विजयाची प्रतीक्षा करत असतानाच विजयसाठी आवश्यक तयारी करण्याची गरज असल्याचे उबेर कप संदर्भात बोलताना पंतप्रधान म्हणाले. सध्याचा अष्टपैलू खेळाडूंचा संघ भविष्यातही अनेक विजय मिळवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महिला संघाने देखील उत्कृष्ट कामगिरी केली असून यावेळी नाही तर पुढच्या वेळी मात्र नक्कीच महिला संघ विजयश्री खेचून आणेल असेही ते म्हणाले. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात मिळणारी हे यश प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद आहे. ‘आय कॅन डू इट’ हा नव्या भारताचा मंत्र बनत आहे असेही पंतप्रधान म्हणाले. प्रत्येक खेळाडूने स्पर्धेतल्या विजयावर लक्ष केंद्रित न करता स्वतःच्या कामगिरीवर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे असा सल्ला त्यांनी दिला. या विजयामुळे या संघाकडून देशवासीयांच्या अपेक्षा वाढल्या आहेत हे रास्तच आहे. मात्र, खेळाडूंनी या अपेक्षांपासून प्रेरणा घेऊन प्रोत्साहित होऊन भविष्यातही विजय मिळवावा अशी अपेक्षा पंतप्रधानांनी व्यक्त केली.

गेल्या सात-आठ वर्षात भारतीय खेळाडू विविध क्रीडा प्रकारात नवनवे विक्रम स्थापित करत असल्याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले. ऑलिंपिक, पॅरालिम्पिक, डेफलंपिक या स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंच्या कामगिरीचा त्यांनी उल्लेख केला. क्रीडा क्षेत्राकडे पाहण्याचा सर्वांचा दृष्टीकोण सकारात्मक होत असल्याचे त्यांनी सांगितले. क्रीडा क्षेत्रात नवीन युग सुरू होत असून हे भारतीय क्रीडा इतिहासातले  सुवर्णपान आहे. तुमच्यासारखे विजयी खेळाडू तसेच तुमच्या पिढीचे सर्व खेळाडू या सुवर्ण पानाचे लेखक आहेत, असे गौरवोद्गार पंतप्रधानांनी काढले. ही गती  यापुढेही अशीच कायम ठेवणे  गरजेचे आहे असेही पंतप्रधान म्हणाले. देश कायमच सर्व खेळाडूंच्या पाठीशी उभा राहील असे आश्वासन पंतप्रधानांनी दिले.