अजित पवार यांच्यासह ९ मंत्र्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची विधानसभा अध्यक्षांकडे याचिका

प्रफुल्ल पटेल व तटकरे यांची हकालपट्टी 

मुंबई,३ जुलै /प्रतिनिधी :-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ९ सदस्यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व प्रदेशाध्यक्ष यांना कोणतीही कल्पना न देता पक्ष धोरणाच्या, हिताच्या विरोधात कारवाया करत शपथ घेतली ती त्यांची कृती बेकायदेशीर असून पक्षाला अंधारात ठेवल्याने याबाबत एका सदस्याने शिस्तभंग समितीकडे तक्रार केली त्यानंतर समितीच्या सूचनेवरून त्या ९ जणांचे सदस्यत्व रद्द करण्याची याचिका विधानसभा अध्यक्षांकडे ईमेलद्वारे दाखल केली असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी रात्री उशिरा झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

दरम्यान त्यांचे तात्काळ सदस्यत्व रद्द करावे अशी मागणी करणारे पत्र विधानसभा अध्यक्षांना ईमेल आणि व्हॉटस्ॲपवरद्वारे आणि त्यांच्या आय मेसेजवरदेखील पाठवण्यात आले आहे. सदस्यत्व रद्द करण्याच्या याचिकेवर लवकरात लवकर बाजू ऐकून घ्यावी अशी विनंतीही केली आहे.याशिवाय निवडणूक आयोगालाही याबाबत कळवण्यात आले असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्ते शरद पवार यांच्या सोबत आहेत. सर्व जिल्हयातील पक्षाचे अनेक पदाधिकारी समर्थनासाठी बाहेर आले आहेत. ९ आमदार म्हणजे पार्टी होऊ शकत नाही. त्यांनी जी शपथ घेतली आहे ती पक्षाच्या अध्यक्षांना न सांगता केलेली कृती आहे. त्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस कायदेशीर पावले उचलेल असे जाहीर केले होते त्यानुसार पावले आम्ही उचलली आहेत.विधानसभा अध्यक्ष याबाबत आम्हाला लवकरात लवकर सुनावणीला बोलवतील अशी अपेक्षा जयंत पाटील यांनी व्यक्त केली.

पक्षांतर विरोधी कायदा लागू होईल का?
या कायद्याच्या दोन अटी आहेत. ज्या पक्षाचा नेता जात आहे तो पक्ष दुसऱ्या पक्षात विलीन करावा. दोन तृतीयांश आमदार सहमत आहेत. दोन्ही अटी अजितच्या बाजूने आहेत. विधानसभेतील राष्ट्रवादीच्या एकूण ५३ आमदारांपैकी ४० हून अधिक आमदारांचा पाठिंबा असल्याचा अजित पवारांचा दावा आहे. पक्षांतर विरोधी कायद्यातील तरतुदी टाळण्यासाठी अजितकडे ३६ पेक्षा जास्त आमदार असणे आवश्यक आहे.

प्रफुल्ल पटेल व तटकरे यांची हकालपट्टी 

image.png

जयंत पाटील व जितेंद्र आव्हाड यांच्या अपात्रेबाबत याचिका 

मुंबई :-राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी खासदार प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. त्यांची कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आज शरद पवार यांना पत्र लिहून या दोघांवर कारवाई करावी, अशी मागणी केली होती. 

अजित पवार गटाने जयंत पाटलांना प्रदेशाध्यक्षपदावरून हटवल्याचं जाहीर केलं. याशिवाय जयंत पाटील व जितेंद्र आव्हाड यांच्या अपात्रेबाबत विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहिलं. या पार्श्वभूमीवर आता शरद पवारांनी दिल्ली राष्ट्रवादीबाबत मोठा निर्णय घेतला आहे. याबाबत पत्र जारी करत त्यांनी दिल्ली राष्ट्रवादीची जबाबदारी आपल्या विश्वासू नेत्यावर सोपवली आहे.

शरद पवार यांनी दिल्ली राष्ट्रवादी काँग्रेसची जबाबदारी सोनिया दूहान यांच्या खांद्यावर दिली आहे. या त्याच सोनिया दूहान आहेत ज्यांनी मागच्या वेळी राष्ट्रवादीत झालेल्या बंडाच्यावेळी महत्त्वाची भूमिका बजावली होती. तसेच आताही राष्ट्रवादीतील बंडानंतर त्या ठामपणे शरद पवारांबरोबर उभ्या राहिल्या.या घोषणेनंतर लगेचच अजित पवार यांनी राष्ट्रवादीची नवी टीमही बनवली. त्यांनी खासदार सुनील तटकरे यांना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष केले आहे. अनिल पाटील यांच्याकडे व्हीपची जबाबदारी देण्यात आली आहे.

शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने अजित पवार यांच्यासोबत असलेल्या सर्व आमदारांना अपात्र ठरवण्याचा ठराव मंजूर केला होता.अजित पवार यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी गेलेल्या तीन नेत्यांचीही पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यात पक्षाचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, अकोला शहर जिल्हाध्यक्ष विजय देशमुख आणि मुंबई विभागाचे कार्याध्यक्ष नरेंद्र राणे यांचा समावेश आहे.