जमीन नावावर करून घेण्यासाठी सावत्र मुलाने काढले चक्क आईचे मृत्यू प्रमाणपत्र ; ग्रामसेवकाची पोलिसात तक्रार

वैजापूर तालुक्यातील आघुर येथील घटना

वैजापूर ,​४​ जुलै / प्रतिनिधी :-तीन एकर शेतजमीन नावावर करुन घेण्यासाठी सावत्र मुलाने चक्क आई मयत झाल्याचे दाखवून तिचे मृत्यु प्रमाणपत्र तयार केल्याचा प्रकार वैजापूर तालुक्यातील आघूर येथे उघडकीस आला आहे. मंगलाबाई उत्तम सिंह राजपूत असे या महिलेचे नाव असून त्यांनी याबाबत तक्रार दिली आहे. तथापि, खोटे प्रमाणपत्र काढल्याचे लक्षात आल्यानंतर पंकज राजपूत यांच्याविरुद्ध प्रशासनाने तातडीने पोलिसांत तक्रार दिली असून याबाबत गटविकास अधिकारी व संबंधित तलाठी यांनाही कळवण्यात आले आहे. त्यामुळे सदर मृत्यु प्रमाणपत्र रद्द झाल्यात जमा आहे.

या घटनेबाबत अधिक माहिती अशी की वैजापूर तालुक्यातील आघूर येथील रहिवासी मंगलाबाई उत्तम सिंह राजपूत यांच्या नावावर आघूर शिवारात तीन एकर शेतजमीन असून ही शेतजमीन आपल्या नावावर करण्यासाठी त्यांचा सावत्र मुलगा पंकज उत्तमसिंह राजपूत याने ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन आई मयत झाल्याची खोटी माहिती देऊन नोंद केली. या माहितीच्या आधारे पंकज याला आईच्या मृत्यु प्रमाणपत्र देण्यात आले.‌ हे प्रमाणपत्र पंकज याने तलाठ्याकडे सादर केले. मात्र, दोन दिवसानंतर पंकज याने खोट्या माहितीच्या आधारे मृत्यु प्रमाणपत्र मिळवल्याची माहिती मिळताच ग्रामसेवक के.जी.पवार यांनी तातडीने पोलिस ठाण्यात धाव घेऊन पंकज राजपूत यांच्याविरोधात तक्रार दिली. तसेच या तक्रारीची प्रत व माहिती गट विकास अधिकारी यांना देत आघुरचे तलाठी दिलवाले यांनाही कळवण्यात आले. त्यामुळे जमीन वारसाची कुठलीही कार्यवाही करण्यात आली नाही अशी माहिती समोर आली आहे.