वैजापूर-गंगापूर तालुक्यातील रस्त्यांसाठी अर्थसंकल्पात 93 कोटींची तरतूद

वैजापूर ,१३ मार्च / प्रतिनिधी :- यंदाचा राज्याच्या अर्थसंकल्पात तालुक्यातील विविध भागांना जोडणाऱ्या रस्त्यांच्या मजबुती व सुधारणा करणे कामांसाठी तब्बल 93 कोटींची तरतूद  करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील रस्त्यांची दुर्दशा संपणार आहे.

गंगापुर-वैजापूर विधानसभा मतदारसंघातील दळणवळण सुविधेच्या अनुषंगाने 34 विविध रस्ते गेल्या अनेक दिवसांपासून मजबूत व दुरुस्त करणे अतिशय गरजेचे झाले होते.अखेर प्रदीर्घ कालावधीपासून रेंगाळलेला तालुक्यातील रस्त्यांच्या प्रश्न मार्गी लागला आहे. स्वातंत्र्योत्तर काळात प्रथमच वैजापूर तालुक्याच्या पदरात एवढे भरभरून निधी मिळाल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. 

फडणवीस सभागृहाच्या पटलावर अर्थसंकल्प सादर करताना वैजापूरकर आपल्या तालुक्यासाठी काय मिळते याबाबत उत्सुक होते. तालुक्यातील दळणवळण सुविधेच्या अनुषंगाने विविध रस्ते गेल्या अनेक वर्षापासून मजबूत व दुरुस्त करणे अतिशय गरजेचे झाले होते.सदर रस्त्यांच्या आजूबाजूला वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांच्या व विद्यार्थ्यांच्या प्रवास मार्गातील अडथळे दूर करण्यासाठी हे रस्ते सुधारित करण्यात यावेत यासाठी आमदार रमेश बोरणारे यांनी संबंधित विभागाकडे या रस्त्यांसाठी आर्थिक तरतूद करण्याची मागणी वेळोवेळी पत्राद्वारे केली होती. आमदार बोरणारे यांनी केलेल्या या मागणीची राज्य पातळीवर दाखल घेऊन हा निधी मंजूर झाल्याने या रस्त्यांचा कायापालट होण्यास खूप मोठी मदत झाली आहे.

या रस्त्यांचे भाग्य उजळणार

मालेगांव-नांदगांव-शिऊर, तलवाड़ा-जानेफल-खंडाला, वीरगांव-शिरसगांव-जातेगांव, शहापुर-खादगांव-गाजगांव गवली शिवरा, शंकरपुर ते वजनापुर, तुर्काबाद-राजुरा-तांदुलवाड़ी, चीकटगांव ते लोणी, काटेपींपलगांव ते शंकरपुर,राष्ट्रीय राज्यमार्ग क्र 752 ते परसोड़ा, मांजरी ते वरखेड़, पारला ते हिलालपुर, नागमठाण ते गाढेपींपलगांव, जातेगांव ते गाढेपिंपळगांव, खिर्डी ते बोरसर, लाडग़ांव ते वांजरगांव, सावखेड़गंगा ते कापूसवाडगांव,जळगांव ते काटेपींपलगांव, परसोड़ा ते धोंदलगांव,अंचलगांव ते नायगव्हान, बोरसर ते भिवगांव, ख़िरडी ते समृद्धी राज्यमार्ग, कौटगांव ते डाग  पिंपळगांव, तिडी ते सवंदगांव, पालखेड ते शिवराई, जातेगांव ते नागमठाण, कौटगांव ते नादी, गोलवाड़ी ते रामनगर, शिऊर ते सावखेड़, शहापुर ते शेकटा, अगरसायगांव ते शिवराई, वरखेड़ ते गाढेपिंपळगाव, गाजगांव ते देरडा आदि रस्त्यांच्या कामांसाठी 93 कोटी रूपयांची मान्यता मिळाली आहे.

वैजापूर-गंगापुर विधासनसभा मतदारसंघातील खराब झालेल्या रस्त्याच्या कामासाठी गेल्या कित्येक वर्षापासून निधीची मागणी सुरु होती.अखेर या सरकारने बजेटमध्ये जो निधी मंजूर केला. त्याबद्दल मी सरकारचा आभारी आहे अशी प्रतिक्रिया आमदार रमेश बोरणारे यांनी दिली.