राष्ट्रवादीचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांचा जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत एकसष्टी सोहळा

वैजापूर,१६ मार्च  /प्रतिनिधी :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर येत्या 17 मार्च रोजी त्यांच्या आयुमानाचे 61 वर्ष पूर्ण करणार आहेत. राजकीय कारकीर्दीचा रौप्यमहोत्सवी वर्षाचा टप्पाही त्यांनी गाठला आहे.या दुहेरी शुभचिंतन क्षणाचे औचित्य साधून तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्थानिक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष  जयंत पाटील  यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांचा ” एकसष्ठी अभिष्टचिंतन ” सोहळा गुरुवारी वैजापूर शहरात साजरा करण्यात येत आहे.

सकाळी 9.30 वाजता कृष्णा लाॅन्स येथे हा समारंभ आयोजित केला आहे.डोंगरथडी भागातील चिकटगावचे भुमीपुत्र म्हणून ओळखले जाणारे भाऊसाहेब पाटील चिकटगावकर 1990 पासून नगरपालिका निवडणूकीच्या माध्यमातून राजकीय क्षेत्रात ते सक्रिय झाले होते.नगरसेवक ते आमदार असा राजकारणातील महत्वाचा टप्पा त्यांनी स्वकर्तृत्वावर गाठला.या वाटचालीत सामाजिक, राजकीय जीवनातील त्यांच्या कर्तृत्व आणि नेतृत्वाचा गौरव अभिष्टचिंतन कार्यक्रमाच्या माध्यमातून केला जाणार आहे.

या कार्यक्रमाला सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ.राजेश टोपे, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंढे, रोजगार हमी मंत्री संदिपान भुमरे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, नांदेडचे खासदार प्रतापराव चिखलीकर, माजी मंत्री विनायकराव पाटील, आ.सतीश चव्हाण, आ.आशुतोष काळे, आ.अंबादास दानवे, आ.रमेश पाटील बोरनारे, माजी नगराध्यक्ष साबेर खान, भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ.दिनेश परदेशी, बाळासाहेब संचेती यांच्यासह सर्वपक्षीय नेते व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.या कार्यक्रमाला मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शहर व ग्रामीण शाखेच्या वतीने करण्यात आले आहे