आ.बोरणारेंविरोधात दाखल विनयभंगाचा खोटा गुन्हा रद्द करा -वैजापूर तालुका शिवसेनेची मागणी

निषेधार्थ शिवसेनेतर्फे गुरुवारी मोर्चा,उपविभागीय अधिकाऱ्याना निवेदन देणार

वैजापूर,१६ मार्च  /प्रतिनिधी :-कौटुंबिक वादातून बोरणारे कुटुंबियांमध्ये झालेल्या मारहाणीच्या प्रकरणाला राजकीय वळण देण्याचा विरोधकांकडून प्रयत्न केला जात असून आमदार रमेश पाटील बोरणारे यांच्याविरोधात दाखल मारहाणीच्या गुन्ह्यात विनयभंगाचे कलम लावण्यात आले आहे.सूडबुद्धीने व राजकीय दबावाखाली आ.बोरणारे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप शिवसेनेने केला असून, या निषेधार्थ शिवसेनेतर्फे गुरुवारी सकाळी वैजापुरात मोर्चा काढण्यात येणार आहे.

आ.बोरणारे व त्यांच्या चुलत भावजयी जयश्री बोरणारे यांच्यात गेल्या दोन-तीन वर्षांपासून कौटुंबिक वाद सुरू आहे.भाजपच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याच्या कारणावरून बोरणारे यांच्या कुटुंबियातील महिलांमध्ये वर्षश्राध्दच्या कार्यक्रमात वाद होऊन त्याचे पर्यावसन मारहाणीत झाले होते.या प्रकरणी जयश्री बोरणारे यांच्या तक्रारीवरून आ.बोरणारे यांच्यासह दहा जणांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल झालेला आहे. तर आ.बोरणारे यांचे स्वीयसहायक रामनाथ वाघ यांच्या तक्रारीवरून जयश्री बोरणारे यांच्याविरुद्ध अट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आ.बोरणारे यांच्या विरोधकांकडून या प्रकरणाला हवा देऊन राजकीय वळण देण्यात येत असल्याचे सध्या चित्र आहे.या प्रकरणात भाजप महिला आघाडीच्या चित्राताई वाघ यांनी वैजापूरला भेट देऊन आ.बोरणारे विराधात दाखल गुन्ह्यात विनय भंगाचे कलमे लावण्यात यावी अशी मागणी पत्रकार परिषदेत केली होती. दरम्यान जयश्री बोरणारे यांनी 13 मार्च रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी कैलास प्रजापती यांच्या समक्ष दिलेल्या पुरवणी जबाबावरून पोलिसांतर्फे यापूर्वी दाखल गुन्ह्यात भा.द.वी.कलम 354 व 354 (अ) ही विनयभंगाची कलमं जोडण्यात आली आहे.आ.बोरणारे यांच्याविरोधात सूडबुद्धीने व राजकीय दबावाला बळी पडून विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला असून तो रद्द करण्यात यावा अशी मागणी शिवसेनेतर्फे करण्यात आली आहे.            
यासंदर्भात शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष साबेर खान यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पाटील जगताप, तालुकाप्रमुख सचिन वाणी, शहरप्रमुख राजेंद्र पाटील साळुंके, जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती अविनाश पाटील गलांडे, नगरसेवक प्रकाश चव्हाण यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते गुरुवारी उपविभागीय अधिकारी यांची भेट घेऊन निवेदन निवेदन देणार आहेत.