वैजापूर तालुक्यात सर्वदूर पाऊस करंजगाव – संजरपूरवाडी भागात ढगफुटी ; बोर नदीला पूर

वैजापूर ,​४​ जुलै / प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यात आज सायंकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. तालुक्यातील करंजगांव, संजरपूरवाडी भागात ढगफुटी सदृश परिस्थिती निर्माण झाली. करंजगांव येथे 12 तासात 126 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून बोर नदीला पूर आला. पुराचे पाणी अनेक घरात शिरले असून जमिनीही वाहून गेल्याचे वृत्त आहे. 

जून महिना उलटला तरी पाऊस नसल्याने शेतकरी चिंतेत होता. पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला आहे. तालुक्यात आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण निर्माण होऊन वातावरणातील उष्मा वाढला होता. सायंकाळी सहाच्या सुमारास पाऊस सुरू झाला. रात्री उशिरापर्यंत पाऊस कमी अधिक प्रमाणात सुरू होता. तालुक्यातील करंजगांव, परसोडा, संजरपूरवाडी, सिद्धापूरवाडी, जम्मनवाडी, बोरसर या भागात जोरदार पाऊस झाला. ढगफुटी सदृश परिस्थिती या भागात निर्माण होऊन बोर नदीला पूर आला. नदीकाठच्या अनेक घरांमध्ये पुराचे पाणी शिरले असून पेरणी केलेल्या बियाणांसह जमिनी वाहून गेल्याचे वृत्त आहे.