वैजापूर तालुक्यातील अंगणवाड्यात ७७ मुले अतितीव्र कुपोषित

वैजापूर ,२७ मार्च / प्रतिनिधी :- देशात महासत्ता, बुलेट ट्रेन, संगणक युगाचे वारे वाहत असले तरी दुसरीकडे देशाचे भवितव्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लहान मुलांच्या कुपोषणाचा प्रश्न अजूनही संपायला तयार नाही. एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयातर्गंत अंगणवाड्यांच्या मुलांना मोठ्या प्रमाणावर पोषक आहार मिळत असतानाही तालुक्यात अतितीव्र कुपोषित 77 मुले – मुली आढळून आल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे अंगणवाड्यांचा आहार खरंच मुलांना मिळतो की नाही ?  याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

नुकतीच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांच्या प्रमुख उपस्थितीत सरपंच परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेच्या निमित्ताने कुपोषित बालकांचा प्रश्न चर्चेत आला असता संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी तालुक्यात एकूण 77 मुले – मुली कुपोषित असल्याचे उत्तर मीना यांना दिले. संबधित अधिकाऱ्यांनी बचावात्मक पवित्रा घेऊन केवळ ‘कुपोषित’ असल्याचे सरकारी उत्तर त्यांना दिले. परंतु याबाबत खोलात जाऊन माहिती घेतली असता ही सर्व मुले अतितीव्र कुपोषित वर्गात मोडतात. कुपोषणामध्येही शासनाने वर्गवारी केलेली असून अतितीव्र, मध्यमतीव्र व साधारण कुपोषण अशा तीन वर्गवारी करण्यात आल्या आहेत. एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयातर्गंत अंगणवाड्यांच्या मुलांमध्ये ही वर्गवारी करण्यात आलेली असून तीन वर्षाखालील मुलांना एकाचवेळी 50 दिवसांच्या आहाराचे घरपोच वाटप केले जाते. यामध्ये चणा, मसुरदाळ, गहू, मिरची, हळदी, साखरेचा समावेश आहे. तसेच 3 ते 6 वर्षे वयोगटातील मुलांना लापसी, खिचडी व उसळीचा आहार दिला जातो. दरम्यान कुपोषणाचा हा व वर्गवारी पाहता मुलांची परिस्थिती नक्कीच चिंताजनक आहे. परंतु एकात्मिक बालविकास प्रकल्प विभाग कुपोषणाचे उत्तरदायीत्व स्वीकारायला तयार नाही. अगोदर त्यांनी सध्यस्थितीत 50 बालके अतितीव्र कुपोषित असल्याचा दावा केला आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची जेव्हा बैठक झाली तेव्हा 77 मुलांचा आकडा बरोबर होता. असे सांगायलाही ते विसरले नाहीत. अंगणवाड्यांतील मुले ही केवळ तीन तास आमच्याकडे असतात. त्यामुळे उर्वरित वेळी आहारावर लक्ष देणे आईवडिलांची जबाबदारी आहे. याशिवाय दोन मुलांमध्ये अंतर कमी असणे, आई कुपोषित असणे, बालविवाह, अंगावरील दूध कमी पाजणे व आहाराच्या कमतरतेमुळे मुले कुपोषित होत असल्याचा दावा बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी केला आहे. परंतु त्यांच्या दाव्यात सत्यता असली तरी कुपोषण हद्दपार करण्यासाठी शासनस्तरावर मोठ्या प्रमाणावर उपाययोजना केल्या जात आहे. अंगणवाड्यांच्या माध्यमातून सकस व पोषक आहार वाटप केला जातो. त्याचे वाटप व अंगणवाड्यांचा कारभार सुरळीत सुरू आहे किंवा नाही?  याबाबत खात्री केली पाहिजे. या विभागातर्गंत दहा पर्यवेक्षिका आहेत. यातील बहुतांश पर्यवेक्षिका  या मुख्यालयी राहत नाही . दरम्यान कुपोषणासाठी कौटुंबिक कारणे असली तरी एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयातर्गंत असलेल्या पर्यवेक्षिकांसह अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी जोमाने काम केल्यास कुपोषित बालकांचा प्रश्न सुटल्याशिवाय राहणार नाही. 

बोरसर – 4, खंडाळा – 12, गाढेपिंपळगाव – 4, शिऊर – 4, लाडगाव (1) – 10, महालगाव – 5, लाडगाव – 2, पालखेड – 4 मनूर – 3 व लोणी खुर्द – बीट मधील 1 असे 77 मुले अती तीव्र कुपोषित असल्याचे आढळून आले आहे.