भाजप प्रदेश सरचिटणीस पदी आमदार अतुल मोरेश्वर सावे तर प्रवीण घुगे यांची प्रदेश चिटणीस पदी निवड

प्रदेश उपाध्यक्षपदी बसवराज मंगरुळे यांची नियुक्ती

औरंगाबाद,२४ऑगस्ट /प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सरचिटणीसपदी आ. अतुल सावे, प्रदेश सचिवपदी प्रवीण घुगे यांची तर प्रदेश उपाध्यक्षपदी कृपाशंकर सिंग, बसवराज मंगरुळे, संजय भेंडे  यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपा प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या टीममध्ये या नव्या पदाधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी याबाबतची घोषणा केली आहे. या खेरीज प्रदेश उपाध्यक्ष राज के. पुरोहित यांची उद्योग, व्यापार आघाडी व राजस्थानी प्रकोष्ठचे प्रभारी म्हणून, तुषार सोम यांची प्रदेश कार्यकारिणीत निमंत्रीत सदस्यपदी तर देवांग दवे यांची प्रदेश निवडणूक व्यवस्थापन समिती सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

आमदार अतुल मोरेश्वर सावे

May be an image of 1 person and standing

आमदार अतुल सावे हे औरंगाबाद पूर्वमधून दोन वेळा निवडून आले आहेत. त्यांनी औरंगाबाद भाजप शहराध्यक्ष म्हणून काम केले आहे. नगरसेवक म्हणून सावे यांनी कार्य केले आहे. व्यवसायाने ते उद्दोजक आहेत. त्यांच्यावर सरचिटणीस म्हणून नवीन जबाबदारी आली आहे. त्यांच्यासमोर पहिले आव्हान असणार आहे ते औरंगाबाद महापालिका भाजपच्या ताब्यात घेण्याचे. यावेळी आ अतुल सावे यांनी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत (दादा) पाटील व संघटन सरचिटणीस श्रीकांत भारतीय यांचे आभार मानले व पक्षवाढीसाठी माझे सपूर्ण योगदान देईल असे प्रतिपादन केले.

प्रदेश सचिवपदी प्रवीण घुगे

प्रवीण घुगे यांना विद्यार्थी चळवळीतील कार्यकर्ते म्हणून ओळखले जाते.बालपणा पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असलेल्या प्रवीण घुगे यांनी ,अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत प्रदेशमंत्री ,राष्ट्रीय मंत्री अशा विविध जबाबदाऱ्या सतरा वर्ष सांभाळल्या आहेत.1989 मध्ये अभाविपच्या काश्मीर बचाव आंदोलनात त्यांनी सक्रीय सहभाग घेतला होता. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनात सहभागी होऊन, जनमत तयार करण्यासाठी नामांतर समर्थन परिषदा घेण्यासाठी त्यांनी मराठवाडा भर पुढाकार घेतला होता.व्यावसायिक शिक्षण मेडिकल व इंजिनियरिंगच्या प्रवेश प्रक्रिया व शुल्क निर्धारणा साठी समिती गठीत होण्या करीत सुप्रीम कोर्टा पर्यंत यशस्वी लढा दिला.

बसवराज मंगरुळे

बसवराज मंगरुळे हे व्यवसायाने कंत्राटदार आहेत. औरंगाबाद भाजपचे शहराध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले आहे. ते मूळचे उमरगा तालुक्यातील आहेत.पण औरंगाबाद त्यांची कर्मभूमी आहे. त्यांनी इंजिनिअरिंग कॉलेज सुरु केले आहे. औरंगाबाद शहरातील त्यांचे कॉलेज हे उत्तम कॉलेज म्हणून गणले जाते. भाजपचे ते हाडाचे कार्यकर्ते आहेत.