भाजप सोबत असलेल्या पक्षांना हळूहळू संपवत आहे:शिवसेना आणि जेडीयूकडे बोट दाखवत शरद पवारांचा हल्लाबोल

एकनाथ शिंदे यांनी नवा पक्ष काढून नवे चिन्हे घ्यावे-शरद पवार

बारामती,१० ऑगस्ट  /प्रतिनिधी :- भाजप आपल्या मित्रपक्षाला हळूहळू संपवतो. शिवसेना आणि जेडीयूकडे बोट दाखवत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाजपवर हल्लाबोल केला. वेळीच सावध होत नितीश कुमार यांनी शहाणपणाचा निर्णय घेतल्याचेही शरद पवारांनी नमुद केले. ते आज बारामतीत पत्रकारांशी बोलत होते.

बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपसोबतची युती तोडल्याने राजकीय भुकंप झाले आहे. त्यानंतर बोलताना शरद पवार म्हणाले की, जेपी नड्डा म्हणतात की देशात फक्त भाजप हा एकच पक्ष शिल्लक राहील, छोटे-छोटे पक्ष संपतील. यातून एकच स्पष्ट होते की, नितीश कुमार यांची जी तक्रार आहे. त्यातून हे समजते ही भाजपला मित्रपक्षाला संपवायचे आहे. नितीश कुमार यांनी वेळीच सावध होऊन शहाणपणा दाखवल्याचे मत पवारांनी स्पष्ट केले.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी नवा पक्ष काढून नवे चिन्हे घ्यावे. धनुष्यबाण हे चिन्ह शिवसेनेचेच असल्याचे वक्तव्य पवारांनी केले. एखाद्या पक्षाचा चिन्ह काढून घेता येत नाही. एकनाथ शिंदे यांना वेगळी भूमिका घ्यायची असेल तर त्यांनी आपला वेगळा पक्ष काढावा, असा सल्ला पवारांनी शिंदेंना दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आज देश व आंतरराष्ट्रीय स्तरावर घडत असलेल्या विविध घडामोडींबाबत माध्यमांसमोर भूमिका मांडली. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी मध्यंतरी भाषणात स्पष्ट सांगितले की, प्रादेशिक पक्षांना भवितव्य नाही. ते शिल्लक राहणार नाहीत. आमचा एकच पक्ष देशात शिल्लक राहील. यावर पवार यांनी सांगितले की, नितीश कुमार यांची तक्रार आहे की, भाजप सोबत असलेल्या पक्षांना हळूहळू संपवत आहे. त्याचे उदाहरण म्हणजे पंजाबमधील अकाली दल हा मोठा पक्ष त्यांच्यासोबत होता. तो पक्ष त्यांनी जवळपास संपुष्टात आणला आहे. महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजप अनेक वर्ष एकत्र होते. आज शिवसेनेचे विभाजन करून शिवसेना दुबळी कशी करता येईल याची आखणी भारतीय जनता पार्टीने केली. त्याला एकनाथ शिंदे आणि इतर लोकांची मदत झाली. त्यामुळे महाराष्ट्रातील शिवसेनेवर एकप्रकारचा आघात त्यांच्या एकेकाळच्या मित्रपक्षाने केला. हेच चित्र बिहारमध्ये दिसत होते. नितिश कुमार हे लोकमान्यता असलेले नेतृत्व आहे. मागील निवडणुकीत नितिश कुमार आणि भाजप एकत्र लढले. परंतु भाजपचे अजून एक वैशिष्ट्य असे आहे की ते निवडणुकीत एकत्र येतात आणि मित्रपक्षाचे लोक कसे कमी निवडून येतील याची काळजी घेतात. हे महाराष्ट्रातही घडले.

असेच चित्र बिहारमध्येही दिसायला लागले. बिहारचे मुख्यमंत्री वेळीच सावध झाले आणि भाजपपासून दूर होण्याची भूमिका त्यांनी घेतली. आज भाजपचे नेते त्यांच्याबद्दल टीकाटिप्पणी करत आहेत पण नितिश कुमार यांनी टाकलेले पाऊल अत्यंत शहाणपणाचे आहे. उद्या जे संकट भाजप त्यांच्यावर आणणार आहे त्याची वेळीच नोंद घेऊन त्यांनी खबरदारी घेतली. त्यांनी राज्याच्या आणि त्यांच्या पक्षाच्या दृष्टीने अतिशय योग्य निर्णय घेतला, असे पवार म्हणाले.

शरद पवार नेमके काय म्हणाले 

श्रीलंकेत एकाच कुटुंबाची अनेक वर्षे सत्ता होती. राष्ट्रपती, प्रधानमंत्री, संरक्षणमंत्री, अर्थमंत्री या सगळ्या सत्तेचे केंद्रीकरण त्याठिकाणी झाले. ते होत असताना लोकांच्या प्रश्नांमध्ये लक्ष घालण्याची जी नेतृत्वाची जबाबदारी होती ती हवी त्या प्रमाणात पाळली गेली नाही. त्यामुळे श्रीलंकेत असंतोष वाढायला लागला. हा असंतोष एका दिवसाचा किंवा एका महिन्याचा नाही तर गेले काही महिने सतत असंतोष वाढत होता. परिणामी अखेर उद्रेक झाला आणि तिथे राज्यकर्त्यांना सत्ता सोडावी लागली. आज भारताच्या दृष्टीने आजूबाजूच्या देशांमध्ये अंतर्गत परिस्थिती नीट राहणे गरजेचे आहे. ज्यावेळी राज्याचे नेतृत्व हे मूलभूत प्रश्नांच्या सोडवणुकीत अयशस्वी होते तेव्हा श्रीलंकेत जे घडले आहे तशी परिस्थिती दिसते. तेच आज आपल्याला बांग्लादेशमध्ये दिसायला लागलेय. कदाचित पाकिस्तानमध्ये सुद्धा हे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपल्या आजूबाजूला जे वातावरण आहे त्याची नोंद देशाच्या राज्यकर्त्यांनी विशेषत: नरेंद्र मोदी आणि त्यांच्या नेतृत्वाखालील सरकारमधील सर्व घटकांनी घेण्याची अत्यंत गरज आहे. जिथे सत्ता केंद्रीत झाली तिथे हे प्रश्न निर्माण झाले. भारतामध्ये सत्ता राष्ट्रीय पातळीवर केंद्रीत होईल का अशी शंका लोकांच्या मनात येत आहे. आज तसे चित्र दिसत नाही, परंतु आपण सावध राहण्याची आणि काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

आमची अपेक्षा होती की १२ तारखेपर्यंत संसदीय अधिवेशन चालेल पण संसद चालविण्यासंबंधीची आस्था केंद्र सरकारमध्ये आहे असे गेल्या काही वर्षांत आम्हाला जाणवलेले नाही. ज्यावेळी संधी मिळेल तेव्हा ते अधिवेशन बंद करतात, चर्चेचा मार्ग बंद करतात. लोकांना आपली मतं मांडण्याची संधी जी सदनामधून मिळते ती थांबवतात आणि आपल्याला हवे तसे काम करतात. लोकसभा आणि राज्यसभा कामकाज लवकर बंद करण्यातून हे पाहायला मिळाले. स्वातंत्र्य दिनाच्या अमृतमहोत्सवानिमित्त एक राष्ट्रीय समिती बनली असून त्याचा मीदेखील सभासद आहे. या समितीच्या बैठकीत हर घर तिरंगा फडकविण्याचे आवाहन करण्यात आले. राष्ट्रध्वज फडकाविण्यात कोणालाही अभिमान वाटेल. हा पक्षीय प्रश्न नाही. हा राष्ट्राचा ध्वज आहे. त्याचा सन्मान या अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने करायच्या कल्पनेला आमची साथ आहे. धनुष्यबाण हे शिवसेनेचे चिन्ह आहे. स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेच्या स्थापनेपासून स्वीकारलेल्या आणि महाराष्ट्राच्या मनात असलेल्या एखाद्या राजकीय पक्षाचे चिन्ह काढून घेणे, त्यातून वादविवाद वाढवणे हे योग्य नाही. जर एकनाथ शिंदे किंवा इतरांना काही वेगळी भूमिका घ्यायची असेल तर ते जरूर स्वतःचा पक्ष काढू शकतात ते चिन्ह करू शकतात. माझे काँग्रेससोबत मतभेद झाले तेव्हा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस हा वेगळा पक्ष काढला. घड्याळ हे वेगळे चिन्ह घेतले. आम्ही त्यांचे चिन्ह मागितले नाही आणि वाद वाढवला नाही. पण काही ना काही तरी करून वाद वाढविण्याची भूमिका कोणी घेत असेल तर लोक त्याला पाठिंबा देणार नाहीत.