वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे १११ कोटी ८७ लाख रुपये अनुदान मंजूर ; लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार

वैजापूर ,२९ जून/ प्रतिनिधी :- गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात सततच्या पावसामुळे (अतिवृष्टीच्या निकषाबाहेरील) पिकांचे नुकसान झालेल्या राज्यातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी १ हजार ५०० कोटी रुपयांची मदत २० जून रोजीच्या शासन निर्णयानुसार मंजूर करण्यात आली आहे.  वैजापूर तालुक्यात ८२ हजार २६२ हेक्टरवरील  पिकांचे नुकसान झाले असून नुकसान भरपाईपोटी  १११ कोटी ८७ लाख ६३ हजार रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे. मदतीची ही रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच जमा होणार आहे.

सततच्या पावसामुळे गेल्यावर्षी पिकांचे नुकसान झालेल्या राज्यातील शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या सुधारित दराने व निकषानुसार १ हजार ५०० कोटी रुपयांचा मदत निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात येत असल्याचा शासन निर्णय २० जून रोजी निर्गमित करण्यात आला. त्यानुसार सततच्या पावसामुळे तालुक्यात पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी १११ कोटी ८७ लाख ६३ हजार रुपयांचा मदत निधी मंजूर करण्यात आला आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर व ऑक्टोबर या दोन महिन्यांच्या कालावधीत सततच्या पावसाने तालुक्यातील ८२ हजार २६२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. संबंधित शेतकऱ्यांसाठी पीक नुकसानीची मदत शासनाकडून मंजूर झाली आहे. मंजूर झालेली १११ कोटी ८७ लाख ६३ हजार रूपयांच्या मदतीची रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे.

अशी मिळणार मदत

राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या सुधारीत दरानुसार व निकषानुसार सतत पावसामुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेत मदत दिली जाणार आहे. त्यामध्ये जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी प्रतिहेक्टर ८ हजार ५०० रुपये, बागायत पिकांच्या नुकसानीपोटी प्रतिहेक्टर १७ हजार रुपये आणि बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीपोटी प्रतिहेक्टर २२ हजार ५०० रुपयांची मदत मिळणार आहे.

अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झालेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी १११ कोटी ८७ लाख ६३ हजार रुपयांचा मदतनिधी मंजूर करण्यात आला आहे. ही मदत शासनाकडून थेट संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने पिकांचे नुकसान झालेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या याद्या तातडीने शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांमार्फत तहसीलदारांना देण्यात आले आहेत असे भाजपचे जिल्हा सरचिटणीस तथा  विधानसभा प्रमुख डॉ. दिनेश परदेशी यांनी सांगितले.