पाणीपुरवठा योजनेत अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांच्या स्थलांतराचे काम आजपासून

बिडकीन परिसरात शुक्रवारी व रविवारी वीजपुरवठा बंद राहणार

छत्रपती संभाजीनगर,२९ जून / प्रतिनिधी :- छत्रपती संभाजीनगर शहराच्या पाणीपुरवठा योजनेच्या कामात अडथळा ठरणाऱ्या विद्युत वाहिन्यांचे 31 जुलैपर्यंत स्थलांतर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार 30 जूनपासून महावितरण हे काम करणार आहे. त्यासाठी बिडकीन परिसरातील काही गावांत शुक्रवारी व रविवारी वीजपुरवठा बंद राहणार आहे. गरज भासल्यास आणखी तीन ते चार दिवस एका दिवसाआड वीज बंद राहील. या अतिमहत्त्वाच्या व अतितातडीच्या कामासाठी ग्राहकांनी सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

         छत्रपती संभाजीनगर शहराच्या पाणीपुरवठा योजनेसाठी विविध शासकीय विभागांना समन्वय ठेवून कामे निर्धारित वेळेत करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिलेले आहेत. त्यानुसार जायकवाडी ते औरंगाबाद शहरादरम्यान विद्युत वितरण वाहिन्या 31 जुलैपर्यंत स्थलांतरित करण्यात येतील, असे महावितरणतर्फे न्यायालयास सांगण्यात आले. यावर न्यायालयाने महावितरणला वीज बंद ठेवून काम करण्यास परवानगी दिलेली आहे.

            बिडकीन परिसरातील अलाना, चितेगाव, औरंगाबाद इलेक्ट्रिकल्स, व्हिडिओकॉन, बिडकीन व जयलक्ष्मी या 33 केव्ही वाहिन्या एकमेकांना समांतर व जवळ आहेत. त्या स्थलांतरित करण्यासाठी सुरक्षिततेसाठी बंद ठेवाव्या लागणार आहेत. त्यामुळे शुक्रवारी (30 जून) व रविवारी (2 जुलै) चितेगाव, पांगरा, फारोळा, शेकटा, लाखेगाव, चिंचोली, जामडी, निलजगाव, बोकुडजळगाव, बाभूळगाव, गेवराई तांडा, पैठणखेडा, नायगाव खंडेवाडी या गावांत तसेच चितेगाव-बिडकीन परिसरातील औद्योगिक ग्राहकांचा वीजपुरवठा बंद राहणार आहे. आवश्यकतेनुसार आणखी तीन ते चार दिवस एका दिवसाआड वीज बंद ठेवून विद्युत वाहिन्या स्थलांतरित करण्यात येतील.

        छत्रपती संभाजीनगर शहराच्या पाणीपुरवठा योजनेच्या अत्यावश्यक व अतितातडीच्या कामासाठी वीज बंद ठेवावी लागणार असल्याने उद्योजकांनी तसेच सर्व शासकीय यंत्रणांनी महावितरणला सहकार्य करावे. शहराच्या विकासासाठी होणारे नुकसान सहन करावे, अशी अपेक्षा उच्च न्यायालयाने व्यक्त केलेली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार निर्धारित वेळेत हे काम पूर्ण करायचे असल्याने नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.