वैजापूर शहरात 15 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमीपूजन व लोकार्पण

वैजापूर,१४ एप्रिल  /प्रतिनिधी :-राज्याचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे हे शुक्रवारी वैजापूरच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत वैजापूर शहरातील 14 कोटी 65 लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमीपुजन व लोकार्पण करण्यात येणार आहे अशी माहिती आमदार संपर्क कार्यालयातून देण्यात आली.

सकाळी साडे दहाला एकनाथ शिंदे यांचे खासगी हेलिकॉप्टरने वैजापूर गंगापूर रस्त्याच्या पश्चिमेस समृद्धी महामार्गावर हेलीपॅडवर आगमन होणार असुन तेथुन मोटारीने वैजापूर शहराकडे प्रयाण होणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वैजापूर शहरातील संकट मोचन हनुमान मंदिर येथे तीन सिमेंट रस्त्यांच्या कामांचे भुमीपुजन करण्यात येईल. त्यानंतर औरंगाबाद रस्त्यावरील म्हसोबा चौक ते माजी नगराध्यक्ष बाळासाहेब संचेती यांच्या निवासस्थानापर्यंत असलेल्या रस्त्याच्या डांबरीकरण कामाचे भूमीपुजन करण्यात येईल. शहरातील बाजारातळ शादीखाना सभागृह बांधकाम कामाचा लोकार्पण सोहळा होणार आहे. जाहीर सभेचेही आयोजन करण्यात आले आहे. मुरारी पार्क येथे सभागृह बांधकाम व सुशोभिकरण कामाचा लोकार्पण सोहळा शिंदे यांच्या हस्ते आमदार रमेश बोरनारे व शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.

या कार्यक्रमास शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, शिवसैनिक यांच्यासह नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आमदार रमेश बोरनारे, उपनगराध्यक्ष साबेर खान, शिवसेनेचे उप जिल्हा प्रमुख बाबासाहेब जगताप, तालुकाप्रमूख सचिन वाणी व शहरप्रमुख राजेंद्र साळुंके यांनी केले आहे.